|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » क्रिडा » सेनेगलला नमवून कोलंबिया बाद फेरीत

सेनेगलला नमवून कोलंबिया बाद फेरीत 

वृत्तसंस्था /समारा :

येरी मिनाने केलेल्या एकमेव गोलच्या बळावर कोलंबियाने सेनेगलचा 1-0 असा पराभव करत रशियातील फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या उपउपांत्यपूर्व फेरीत जोरदार धडक मारली. येरी मिनाने 74 व्या मिनिटाला या सामन्यातील एकमेव गोल केला. सेनेगलने या लढतीत बरोबरीसाठी उर्वरित खेळात बराच संघर्ष केला. पण, समन्वयाच्या अभावामुळे त्यांच्या या प्रयत्नांना अजिबात यश आले नाही. या निकालासह त्यांचे स्पर्धेतील आव्हानही संपुष्टात आले.

74 व्या मिनिटाला येरी मिनाने कॉर्नर पासवर समयोचित हेडर लगावत गोलजाळय़ाचा अचूक वेध घेतला. येरीने फटकावलेला चेंडू प्रतिस्पर्धी गोलरक्षकाच्या हाताला स्पर्शून गोलजाळय़ात गेला आणि या लढतीतील एकमेव गोल नोंदवला गेला.

पहिल्या सत्रापेक्षा दुसऱया सत्रात कोलंबियाने प्रत्यक्ष गोलपोस्टवर अधिक आक्रमणे केली आणि याचा त्यांना दुसऱया सत्रातच खरा लाभ झाला. या लढतीपूर्वी, सेनेगलच्या खात्यावर 4 तर कोलंबियाच्या खात्यावर 3 गुण होते. गटात कोलंबिया तिसऱया स्थानी होता. पण, या विजयामुळे ते अव्वलस्थानी विराजमान झाले आणि बाद फेरीतील त्यांचे स्थानही निश्चित झाले.

सेनेगल व कोलंबिया यांच्यात यापूर्वी मे 2014 मध्ये एकमेव लढत झाली, त्यात 2-2 अशी बरोबरी झाली होती. पहिल्या सत्रात कोलंबियाने तेथे 2-0 अशी आघाडी घेतली तर सेनेगलने दुसऱया सत्रात 2 गोल करत हिशेब चुकता केला होता. त्यानंतर इथे प्रथमच आमनेसामने भिडत असताना कोलंबियाने विजयाची अचूक संधी साधली.
मागील 7 विश्वचषक सामन्यात 10 गोलमध्ये प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष वाटा उचलणाऱया जेम्स रॉड्रिग्यूजला येथे फारसा सूर सापडला नाही. पण, त्याच्या सहकाऱयांनी याची फारशी कसर जाणवू दिली नाही.

Related posts: