|Monday, June 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » डबेवाडी बनतेय बायोगॅसचे गाव

डबेवाडी बनतेय बायोगॅसचे गाव 

घराघरात उभारला जातोय बायोगॅस, गावतील 80 शेतकऱयांचा पशू पालनाचा व्यवसाय

विशाल कदम / सातारा

हल्ली घरोघरी सिलिंडर गॅस ग्रामीण भागातही दिसू लागला आहे. शेती करणाऱया मंडळीकडे पाळीव जनावरांची संख्या घटू लागली आहे. परंतु सातारा तालुक्यातील डबेवाडी या गावात तरुण आणि जेष्ठ मंडळीनी पशुधनाचे महत्व ओळखून शेतीला जोडधंदे सुरू ठेवले आहेत. आता या गावात तब्बल 50 बायोगॅस असून अजून ही बायोगॅस बसवण्यावर भर दिला जात आहे. त्यामुळे डबेवाडी हे गाव बायोगॅसचे गाव बनू लागले आहे.

हल्ली गॅसच्या किमती दर महिन्याला वाढत असतात. ग्रामीण भागातही सिलिंडर गॅस ही संकल्पना पोहचली आहे. सिलिंडर गॅस हे कधी तरी संपणारे इंधन आहे. तसेच शेती करताना शेतकरी शेतीला जोडव्यवसाय म्हणून पशु पालन करतात. तो ही व्यवसाय यांत्रिक शेतीमुळे कमी होऊ लागला आहे. परंतु सातारा तालुक्यातील डबेवाडी या गावात जून ते सोन या उक्तीप्रमाणे 80 शेतकरी हे पशू पालनाचा व्यवसाय करतात. गावची लोकसंख्या ही सुमारे दोन हजार असून सुमारे 500 पशुधन गावात आहे. जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या मार्फत राबण्यात येणारी बायोगॅस योजना ही या गावातील शेतकरी लाभ घेतात. सातारा शहरालगत हे गाव असल्याने या गावतील पशुपालक शेतकरी दूध शहरातील हॉटेल व्यवसायिकांना घालतात. आता या बायोगॅस योजनेचा लाभ घेतला जात आहे. सातारा पंचायत समितीचे कृषी विभागातील कृषी अधिकारी शांताराम गोळे, बी. एन. केवटे, दिपक सांळुखे, डॉ. सत्यजित शिंदे, शलाका सोनवणे यांच्याकडून नेहमी सहकार्य होत असून दोन वर्षात बारा जणांनी बायोगॅस योजनेचा लाभ घेतला आहे. अजून ही प्रस्ताव गेले आहेत. जुने बायोगॅस गावात असल्याने हे गाव बायोगॅसचे गाव बनू पहातय.

बायोगॅसचे महत्व मोठे

मी बायोगॅस बसवण्याचा निर्णय घेतला. पंचायत समितीतून चांगले सहकार्य मिळाले. सातबारा, पासबुकची झेरॉक्स आणि खाते उतारा देऊन पंचायत समितीत दिल्यास बायोगॅस बसवला जातो. माझ्याकडे दोन बैल, दोन म्हशी, गाय असे पशुधन आहे. दररोज तयार शेण मिसळून ते बायोगॅसमध्ये केवळ एकवेळ टाकतो. त्यामुळे तयार होणाऱया गॅसवर दोनवेळा स्वयंपाक, आंघोळीचे पाणी एवढा उपयोग होतो. तसेच चांगले खत ही मिळते अशी माहिती भरत शिंदे यांनी दिली.