|Wednesday, January 16, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » चाकूचा धाक दाखवून वृद्धेला लुबाडले

चाकूचा धाक दाखवून वृद्धेला लुबाडले 

आठवडय़ातील दुसरी घटना

प्रतिनिधी / दोडामार्ग:

सासोली पाटये पुनर्वसन येथे गाडीची वाट पाहत उभ्या असणाऱया वृद्धेला लिफ्ट देऊन तिला निर्जनस्थळी नेत चाकूचा धाक दाखवून लुबाडल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी घडला. सीता शांताराम गवस (70, रा. कसई-दोडामार्ग-धाटवाडी) असे लुबाडणूक झालेल्या वृद्धेचे नाव असून त्यांच्या गळय़ातील सोन्याची चेन चोरटय़ाने हिसकावून नेली. याबाबत दोडामार्ग पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आठवडाभरात लुटीच्या सलग दोन घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.

गाडीची वाट पाहत बसथांब्यावर एकटय़ा-दुकटय़ा उभ्या असणाऱया वयोवृद्ध महिलांना लुटण्यावर चोरटय़ांनी आता लक्ष्य केंद्रीत केले आहे. आठवडाभरापूर्वी कसई-केळीचेटेंब येथे बसची वाट पाहत असणाऱया वृद्धेला लिफ्ट देऊन निर्जनस्थळी नेत तिच्या गळय़ातील सोन्याची माळ हिसकावण्याचा प्रकार घडल्यानंतर पुन्हा बुधवारी तशीच घटना सासोली पाटय़े पुनर्वसन येथे बसथांब्यावर उभ्या असलेल्या वृद्धेबाबतीत घडला.

कसई-दोडामार्ग धाटवाडी येथील सीता शांताराम गवस यांच्या घराचे सासोली पाटय़े पुनर्वसन येथे बांधकाम सुरू आहे. त्यामुळे त्या तेथे गेल्या होत्या. दुपारी पुन्हा दोडामार्गमध्ये येण्यासाठी त्या निघाल्या. सासोली पाटये पुनर्वसन येथील बसथांब्यावर त्या बसची वाट पाहत उभ्या होत्या. त्यावेळी तेथे एक मोटारसायकलस्वार आला. त्याने श्रीमती गवस यांना दोडामार्गमध्ये नेतो, असे सांगून लिफ्ट दिली. मात्र, त्यांना दोडामार्गमध्ये न नेता मणेरी येथे एका निर्जनस्थळी नेत जीवे मारण्याची धमकी देत त्यांच्या गळय़ातील सोन्याची चेन हिसकावून घेत तेथून पलायन केले. या प्रकारामुळे श्रीमती गवस यांना धक्का बसला. त्यांना दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. याबाबत पोलीस ठाण्यात अज्ञात चोरटय़ाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

दरम्यान, अनोळखी व्यक्तीच्या वाहनात किंवा मोटारसायकलवर न बसण्याचे आवाहन दोडामार्ग पोलिसांनी केले आहे. वयोवृद्ध महिलांना लुबाडण्यासाठी लक्ष्य करणाऱया चोरटय़ांना पकडण्याचे पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे.

Related posts: