|Monday, September 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » दुधाचं राजकारण ‘उकळलं’

दुधाचं राजकारण ‘उकळलं’ 

आज मध्यरात्रीपासून आंदोलनाचा भडका

गणेश क्षीरसागर/ सोलापूर

आज मध्यरात्रीपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने राज्यभरात दुध दरासाठी आंदोलन पुकारले असतानाच, राज्यातील इतर शेतकरी संघटनांनी या आंदोलनाला असहकार करण्याचा पवित्रा घेतला आहे. शेतकऱयांचे कैवारी म्हणवून मिरवणाऱया शेतकरी नेत्यांनी किमान शेतकऱयांच्या प्रश्नासाठी या दुध दर आंदोलनाला पाठींबा देणे अपेक्षित होते. पाठिंबा न देण्याऐवजी तटस्थ राहण्याचे धोरण स्विकारले असते ठीक. परंतु, संघटनांमधील वर्चस्वाच्या राजकारणासाठी अन्य संघटनांचा दूध अंद आंदोलनाला अलिखीत विरोध आहे. यामध्येच आज मध्यरात्रीपासून दुधाचे राजकारण उकळणार आहे.

स्वाभिमानीचे सर्वेसर्वा खा. राजू शेट्टी यांनी दुध उत्पादक शेतकऱयांच्या प्रश्नासाठी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी गनिमी काव्याची रणनिती खा. शेट्टी यांच्या स्वाभिमानीने आखली आहे. रविवारी  मध्यरात्रीपासून या आंदोलनाचा भडका उडणार आहे. त्यासाठी राज्यातील सर्वच भागामध्ये स्वाभिमानीचे शिलेदार सक्रीय झाले आहेत. कोणत्याही परिस्थतीत पुणे, मुंबई, नागपूर यासह राज्यातील महानगरामध्ये दुधाचा थेंब पोहोचू द्यायाचा नाही. असा व्होरा या आंदोलनाचा आहे.

एकीकडे स्वाभिमानी गनिमी काव्याचा उपयोग करत दुधदराचे आंदोलन छेडण्याच्या पवित्र्यात आहे. तर दुसरीकडे शेतकऱयांचे कैवारी म्हणवून घेणारेच नेते  स्वाभिमानीच्या विरोधात उभारणार असल्याचे चित्र सध्या पहायला मिळत आहे. इतर शेतकरी संघटनांच्या कार्यकर्त्यांच्या वर्तुळात तशी चर्चा आहे. स्वाभिमानीचे हे आंदोलन सरकार मॅनेज असल्याचे भासवत या आंदोलनाला स्वाभिमानी वगळता इतर सर्वच शेतकरी संघटना विरोध करत आहेत. 

आंदोलन करण्यापूर्वीच स्वाभिमानीच्या या आंदोलनाची गंभीर दखल सरकारने घेतली आहे. त्यामुळे स्वाभिमानीच्या आंदोलनाचा भडका जर उडालाच तर दुध उत्पादक शेतकऱयांच्या पदरात नक्कीच काही तरी पडण्याची स्थिती आहे. परंतु, शेतकरी नेत्यांनीच घरभेद्याचे काम केल्यास, मात्र सरकार आपला विचार बदलण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱयांच्या हितासाठी या नेत्यांनी आपले राजकीय मतभेद बाजूला ठेवत आंदोलनात सहभागी व्हावे अशीच शेतकऱयांची भावना आहे.

विठ्ठलाला अभिषेक घालत आंदोलनाला प्रारंभ

15 जुलैच्या मध्यरात्रीपासून महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठ्ठलास, कोल्हापूरच्या महालक्ष्मीस, तुळजापूरच्या भवानीस दुग्धाभिषेक घालत आंदोलनास प्रारंभ करणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फ्ढडणवीस यांना शेतकऱयांचे भले करण्यासाठी सुबुध्दी देण्याचे साकडे यावेळी या देवतांना घालणार आहे. त्यानंतर राज्यभर आंदोलनाचा भडका उठवला जाणार आहे, असे खा. राजू शेट्टी यांनी सांगितले.

सोशल मीडियातून जोरदार प्रचार

दुध आंदोलनामुळेच स्वाभिमानी शेतकऱयांच्या मनात घर करु शकली होती. त्यामुळे पुन्हा दुध दराच्या आंदोलनाच्या माध्यमातूनच शेतकरी संघटना पुन्हा राज्यात सक्रीय होवू पाहत आहे. त्याच पार्श्वभूमिवर आंदोलन यशस्वी करण्यासाठी मोठी तयारी करत आहे. आंदोलनाच्या प्रचारासाठी सोशल मीडियाचा प्रभावी वापर केला जात आहे. ध्स्तुरखुद्द शेट्टी यांच्या आंदोलनाच्या आवाहनाचा व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल करत जोरदार प्रचार केला जात आहे.

परक्यांचा पाठिंबा, स्वकियांचा आडवा दांडू

स्वाभिमानीच्या दूध दरवाढीच्या आंदोलनाला इतर शेतकरी संघटनांचा आडवा दांडू आहे. मात्र स्वाभिमानी संघटनेचे कट्टर विरोधक असलेले राष्ट्रवादी काँग्रेस सारखे परके पक्ष या आंदोलनाच्या बाजूने शेकऱयांच्या हितासाठी उभे आहेत. सोलापूर जिल्हा राष्ट्रवादीचे अध्यक्ष दिपक साळुंखे यांनी नुकतेच एका पत्रकार परिषदेमध्ये स्वाभिमानीच्या आंदोलनाला पाठिंबा असल्याचे जाहीर केले आहे.

आंदोलनाची गंभीर दखल घेतली जाईल

स्वाभिमानीने पुकारलेल्या दुध दर आंदोलनाच्या बाबतीत सहकार आणि पणन मंत्री सुभाष देशमुख यांना विचारले असता शेतकऱयांसाठी आंदोलन करणे ठीक आहे. हे सांगतानाच दुसऱया बाजूला या आंदोलना संदर्भात सरकार गंभीर आहे. आंदोलनाचा विचार केला जाईल. शेतकऱयांना न्याय देण्याच्या दृष्टीने सरकारची पाऊले सकारात्मक पडतील, असे सकारमंत्री देशमुख यांनी सांगितले.