|Monday, August 19, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » रेल्वेतील एसीचा प्रवास महागणार

रेल्वेतील एसीचा प्रवास महागणार 

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

रेल्वेच्या वातानुकूलीत डब्यांमधून (एसी) केला जाणार लांब पल्ल्याचा प्रवास लवकरच महाग होण्याची शक्यता आहे. मात्र ही भाडेवाढ अप्रत्यक्ष स्वरूपाची असेल. प्रत्येक प्रवासाचा दर न वाढवता प्रवाशांना देण्यात येणाऱया बेडरोलचे दर वाढविण्यात येणार आहेत. दूरांतो आणि गरीब रथ एक्स्पेसमध्ये देखील आता बेडरोलसाठी शुल्क आकारण्यात येणार आहे.

बेडरोलच्या दरात गेल्या 12 वर्षांमध्ये कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. मात्र आता 12 वर्षांपूर्वीचा दर रेल्वेला परवडत नाही. कारण हे बेडरोल्स धुण्याचा खर्च वाढला आहे. त्यामुळे त्यांच्या शुल्कात वाढ करण्यात यावी, अशी सूचना महालेखापालांनी केली होती. तिची अंमलबजावणी करण्याचा सरकारचा विचार आहे. येत्या चार ते सहा महिन्यात हे शुल्क वाढविण्यात येणार असल्याचे समजते. सध्या सर्व एसी डब्यांमध्ये बेडरोल किट दिले जाते. त्यासाठी 25 रूपये शुल्क आकारण्यात येते. मात्र दूरांतो आणि गरीब रथ या गाडय़ांमध्ये हे शुल्क आकारण्यात येत नाही. यापुढे या गाडय़ांमध्येही ही सेवा विनामूल्य मिळणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.