|Tuesday, July 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » वाचनामुळे समाजाकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टीकोन निर्माण होतो

वाचनामुळे समाजाकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टीकोन निर्माण होतो 

‘विचार-दूत’ पुस्तकाचे प्रकाशन

प्रतिनिधी/ पणजी

वर्तमापत्र हे एक असे माध्यम आहे ज्यातून आपल्याला समाजस्थिती समजते. ज्येष्ठ पत्रकार सुरेश वाळवे यांनी जे लिखाण केले ते साध्या भाषेत व समजण्यासाठी सोपे होते. वर्तमानपत्रातील लिखाण हे तत्कालिन स्परुपाचे असते त्यामुळे आपण पुस्तकांचे वाचन केले पाहिजे. वाचनामुळे समाजाकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टीकोन निर्माण होतो असे उद्गार कला आणि संस्कृती संचालनालयाचे सचिव दौलत हवालदार यांनी काढले.

कोकणी मराठी परिषद गोवा आणि कला अकादमी आयोजित कालिदास महोत्सव ‘आषाढस्य प्रथम दिवसे’ कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. यावेळी ज्येष्ठ पत्रकार व सत्कारमुर्ती सुरेश वाळवे, सल्लागार समितीचे अध्यक्ष रमाकांत खलप, कार्याध्यक्ष नारायण महाले, अध्यक्ष सागर जावडेकर, सचिव चित्रा क्षीरसागर आणि कोषाध्यक्ष अजित नार्वेकर यांची उपस्थिती होती.

कार्यक्रमात यावर्षीचा कालिदास पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार सुरेश वाळवे यांचा दौलत हवालदार यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. सत्काराचे स्वरुप शाल, श्रीफ्ढळ, मानपत्र, पगडी, मानचिन्ह आणि रोख रक्कम 5,000 रु. असे होते. त्यांना देण्यात आलेल्या मानपत्राचे वाचन मंगेश काळे यांनी केले. यानंतर गुरुदास नाटेकर यांच्या 14व्या ‘विचारदूत’ या वैचारिक लेखसंग्रह पुस्तकाचे दौलत हवालदार यांच्याहस्ते प्रकाशन करण्यात आले.

याप्रसंगी सत्कारमुर्ती सुरेश वाळवे यांनी सांगितले की, आपण स्वतःहून कधीच लिखाण केले नाही. आपल्याहातून जे साहित्य निर्माण झाले ते प्रसंगानुरूप होते. आपल्या हातून कसदार साहित्य निर्माण व्हावे असेही त्यांनी सांगितले. पुढच्यावर्षी आपण 100 लेखांचे ‘अग्रहार’ हे पुस्तक लिहून प्रकाशित करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

गुरुदास नाटेकर यांनी आपले यावेळी मनागेत व्यक्त केले तर ‘विचार-दूत’ या पुस्तकावर पौर्णिमा केरकर यांनी भाष्य केले. पौर्णिमा केरकर म्हणाल्या की, गुरुदास नाटेरक बहुआयामी व्यक्तीमत्व आहे. त्यांच्या लेखातून सुष्म अनुभवाचे सार प्रकटीत होते. यात त्यांचे एकूण 20 लेख असून प्रत्येक लेखात त्यांनी जे सभोवताली अनुभवले त्याचे लिखाण केल्याचे जाणवते. त्यांच्या लेखांवर संस्कृतीचा प्रभाव जाणवत आहे तसेच आपण चांगले वागावे असा बोधही यातून त्यांनी दिला आहे. जर काही चूकत असेल तर ते चुकू नये आणि ते चुकू नये यासाठी उपाय काय आहे हेही त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे सवागत सागर जावडेकर यांनी आणि प्रस्ताविक रमाकांत खलप यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्या शिकेरकर यांनी तर अभारप्रकटन नारायण महाले यांनी केले.

कार्यक्रमाचा शेवटचा भाग म्हणून कविसंमेलनाचेही आयोजन करण्यात आले होत. यात अनक कवि, कवियत्रींनी सहभाग घेतला. ज्येष्ठ समिक्षक, साहित्यिक प्रा. कृष्णाजी कुलकर्णी यांनी संमेलनाचे अध्यक्षपद भूषवले.

यापुर्वी ‘कालिदास’ पुरस्कार एकूण 10 साहित्यिकांना देण्यात आले आहेत. त्यामध्ये विनायक खेडेकर, गजानन रायकर, गोपाळराव मयेकर, श्रीराम पांडुरंग कामत, सुदेश लोटलीकर, विष्णू सूर्या वाघ, गुरुनाथ नाईक, पुष्पाग्रज आणि एस. एस. कुलकर्णी या साहित्यिकांचा समावेश आहे.