|Monday, September 16, 2019
You are here: Home » क्रिडा » एटीपी मानांकनात जोकोविच पुन्हा टॉप टेनमध्ये

एटीपी मानांकनात जोकोविच पुन्हा टॉप टेनमध्ये 

वृत्तसंस्था\ पॅरीस

सर्बियाचा माजी टॉप सीडेड टेनिसपटू नोव्हॅक जोकोविचने रविवारी लंडनमाध्ये चौथ्यांदा विंबल्डन ग्रॅण्ड स्लॅम जेतेपद पटकाविले. या कामगिरीमुळे सोमवारी घोषित करण्यात आलेल्या ताज्या एटीपी मानांकनात जोकोविचने पहिल्या दहा टेनिसपटूमध्ये स्थान मिळविले आहे. या मानांकन यादीत जोकोविच दहाव्या स्थानावर आहे.

वेंबल्डनच्या जेतेपदामुळे जोकोविचच्या मानांकनात 11 अंकांनी सुधारणा झाली. यापूर्वी तो 21 व्या स्थानावर होता. जोकोविचने दक्षिण आफ्रिकेच्या अँडरसनचा 6-2, 6-2, 7-6 (7-3) असा पराभव करून विंबल्डन चषकावर आपले नाव चौथ्यांदा कोरले. गेल्या आठ महिन्यांच्या कालावधीत जोकोविचला पहिल्या दहा टेनिसपटूमध्ये स्थान मिळविता आले नव्हते. ऑक्टोबर 2017 साली जोकोविच एटीपी मानांकनात पहिल्या स्थानावर होता. त्याने आपल्या वैयक्तिक टेनिस कारकीर्दीतील 13 वे ग्रॅण्ड स्लॅम जेतेपद पटकाविले.

एटीपीच्या ताज्या मानांकन यादीत स्पेनचा नादाल 9310 गुणांसह पहिल्या, स्वित्झर्लंडचा फेडरर 7080 गुणांसह दुसऱया, जर्मनीचा ऍलेक्झांडर व्हेरेव्ह 5665 गुणांसह तिसऱया, अर्जेंटिनाचा डेल पोट्रो 5395 गुणांसह चौथ्या, दक्षिण आफ्रिकेचा केव्हिन अँडरसन 4655 गुणांसह पाचव्या, बल्गेरियाचा डिमिट्रोव्ह 4610 गुणांसह  सहाव्या, क्रोएशियाचा सिलीच 3905 गुणांसह सातव्या, अमेरिकेचा इस्नेर 3720 गुणांसह आठव्या, ऑस्ट्रीयाचा थिएम 3665 गुणांसह नवव्या आणि सर्बियाचा जोकोविच 3355 गुणांसह दहाव्या स्थानावर आहेत.