|Thursday, September 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » बेळगावातून पळाला… विटय़ात सापडला!

बेळगावातून पळाला… विटय़ात सापडला! 

पलायनानंतर केवळ 8 तासांत त्याने केला चोरीचा प्रयत्न

प्रतिनिधी/ बेळगाव

निपाणी येथील न्यायालयीन कामकाज आटोपून हिंडलगा मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्धतेत ठेवण्यासाठी घेऊन येताना चोरी प्रकरणातील एका संशयिताने पोलीस हवालदाराच्या हातावर तुरी देऊन पलायन केले होते. गुरुवारी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास हिंडलगा मध्यवर्ती कारागृहाजवळ ही घटना घडली होती. केवळ 8 तासांत पुन्हा चोरीचा प्रयत्न करताना तो विटा (जि. सांगली) पोलिसांच्या जाळय़ात अडकला आहे.

लखन कृष्णात माने (वय 25, रा. वंदुर, ता. कागल, जि. कोल्हापूर) असे त्याचे नाव आहे. गुरुवारी मध्यरात्रीनंतर 1 वाजण्याच्या सुमारास विटा येथे घरफोडीच्या प्रयत्नात असताना स्थानिक नागरिकांना जाग येऊन त्यांनी लखनला रंगेहात पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. विटा पोलिसांनी लखनला अटक केली आहे.

2016 मध्ये निपाणी टाऊन पोलिसांनी चोऱया, घरफोडय़ा केल्याच्या आरोपावरून लखनला अटक केली होती. त्याच्या ताब्यातून चोरीचा मुद्देमालही जप्त करण्यात आला होता. त्याचवेळी न्यायालयासमोर हजर करून त्याची रवानगी हिंडलगा येथील मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली होती. तेंव्हापासून लखनला याच कारागृहात स्थानबध्दतेत ठेवण्यात आले होते.

न्यायालयीन तारखेला हजर राहण्यासाठी निपाणी पोलीस त्याला हिंडलगा कारागृहातून ताब्यात घेऊन निपाणीला नेत होते. गुरुवारी तारखेला हजर राहण्यासाठी हवालदार एस. वाय. होळेदार यांनी लखनला कारागृहातून ताब्यात घेतले. त्यानंतर परिवहन मंडळाच्या बसमधून त्याला निपाणीला नेण्यात आले होते. न्यायालयीन कामकाज आटोपुन कारागृहात स्थानबध्दतेत ठेवण्यासाठी त्याला बेळगावला आणण्यात आले.

गुरुवारी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास हिंडलगा कारागृहपासून हाकेच्या अंतरावर कसतानाच लखनने लघुशंकेला जाण्याचे सांगून पोलीस हवालदाराच्या हातावर तुरी देवून पलायन केले होते. या प्रकरणी बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात गुरुवारी रात्री एफआयआर दाखल करण्यात आले होते. पोलीस निरीक्षक नारायण स्वामी व त्यांचे सहकारी त्याचा शोध घेण्यासाठी प्रयत्न करीत होते.

शुक्रवारी सकाळी सांगली पोलिसांकडून निपाणी पोलिसांना माहिती मिळाली. विटा येथे गुरुवारी मध्यरात्री चोरी करताना लखनला नागरिकांनी रंगेहात पकडून पोलिसांच्या ताब्यात दिल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर निपाणी पोलिसांनी बेळगाव ग्रामीण पोलिसांना ही माहिती दिली आहे. सध्या लखनला न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आले असून न्यायालयाची परवानगी घेवून त्याला ताब्यात घेणार येणार असल्याचे पोलीस अधिकाऱयांनी सांगितले.

लखन माने याच्यावर अनेक गुन्हे आहेत. खास करुन चोऱया, घरफोडय़ा प्रकरणी त्याच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत. पोलीस हवालदाराच्या हातावर तुरी देवून हिंडलगा येथून पलायन करणाऱया लखनने थेट विटा गाठले व पलायनानंतर केवळ 8 तासांत त्याने पुन्हा चोरीचा प्रयत्न केल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे पोलीस अधिकारीही थक्क झाले आहेत.