|Saturday, April 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » ऐतिहासीक तोफा परत मिळविण्यासाठी उभारणा जनआंदोलन

ऐतिहासीक तोफा परत मिळविण्यासाठी उभारणा जनआंदोलन 

शिवप्रेमी राजाभाऊ रसाळ यांचा इशारा

राजापूर तहसीलच्या प्रवेशद्वारावरील तोफ गायब,

मात्र प्रशासनाला गांभीर्य नाही,

प्रांतांधिकाऱयांची तारीख पे तारीख

वार्ताहर /राजापूर

राजापूर शहरातील तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरील गायब झालेली तोफ परत मिळविण्यासाठी शिवप्रेमी नागरिकांकडून वर्षभर पाठपुरावा सुरू असतानाही प्रशासनाला मात्र गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे. महसूल विभागाकडून ‘आढळ नाही’ असे उत्तर येत मिळत असून प्रांताधिकाऱयांकडून चौकशीबाबत केवळ ‘तारीख पे तारीख’ दिली जात आहे. त्यामुळे आता हा पुरातन ठेवा मिळविण्यासाठी जनआंदोलन उभारवावे लागेल, असा इशारा शिवप्रेमी राजाभाऊ रसाळ यांनी दिला आहे.

राजापूरला फार मोठा ऐतिहासीक वारसा असून येथे फार मोठे बंदर होते. ब्रिटीशांनी व्यापाराच्या सोयीसाठी याठिकाणी वखार वसवली होती. छ.शिवाजी महाराजांनी या वखारीवर आक्रमण वखार लुटली होती. त्यामुळे राजापूर शहराची इतिहासात नोंद आहे. या ब्रिटीशकालीन वखारीत पूर्वी तहसीलदार कचेरी होती. यावेळी याठिकाणी इतिहासकालीन दोन तोफा होत्या. 1979 मध्ये तहसील कचेरीचे सध्याच्या जागी स्थलांतर झाले. वखारीमधील इतिहासकालीन तोफांचे जतन व्हावे यासाठी नव्या तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर या तोफा ठेवण्यात आल्या होत्या.

शिवस्मारकाच्या सुशोभिकरणानंतर या तोफा त्याठिकाणी ठेवण्याचा शिवस्मारक जिर्णोध्दार समितीचा मानस होता. त्यामुळे या तोफांची माहिती घेण्यासाठी जिर्णोध्दार समितीचे पदाधिकारी व शिवप्रेमी राजाभाऊ रसाळ हे तहसीलदार कार्यालयात गेले असता त्यांना प्रवेशद्वारावर एकच तोफ असल्याचे आढळून आले. त्यामुळे त्यांनी 2 जून 2017 रोजी तहसीलदारांना पत्र लिहून चौकशीची मागणी केली. मात्र प्रशासनाकडून उडवा उडवी करण्यात आल्याने रसाळ यांनी 12 जून 2017 रोजी महितीच्या अधिकारात माहिती मागविली.

त्यावेळी त्यांना देण्यात आलेल्या माहितीमध्ये जड वस्तू संग्रहालय वहीत ‘तोफांची नोंद अढळ होत नाही’, असे उत्तर देण्यात आल्याचे रसाळ यांनी सांगितले. त्यामुळे पुन्हा आपण जड वस्तू संग्राहालय वहीच्या प्रतींची मागणी केली. यावेळी त्या वहीमध्ये 5 तोफा व 5 गोळे असल्याची नोंद आढळली. तहसील प्रशासनाकडून देण्यात आलेल्या या चुकीच्या माहितीमुळे आपण प्रांताधिकारी, जिल्हाधिकारी, पोलीस प्रशासन तसेच विभागीय आयुक्त यांच्याकडे अर्ज करून गायब झालेल्या तोफांचा छडा लावावा, अशी मागणी केल्याचे रसाळ यांनी सांगितले.

त्यानंतर विभागीय आयुक्त कार्यालयाकडून जिल्हाधिकाऱयांमार्फत या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश राजापूर प्रांताधिकाऱयांना देण्यात आले. मात्र प्रांताधिकारी बैठकांसाठी केवळ तारखा देत आहेत. त्यामुळे प्रशासनाला या ऐतिहासीक ठेव्याबाबत कोणतेही गांभीर्य नसल्याचा आरोप राजाभाऊ रसाळ यांनी केला आहे. प्रशासनाला जर अनास्था असेल तर तोफांचा शोध लावण्यासाठी आणि प्रशासनाला जाग आणण्यासाठी आता राजापूरकरांनांच रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.

Related posts: