|Sunday, December 15, 2019
You are here: Home » राष्ट्रीय » गो-तस्करीच्या संशयावरून राजस्थानमध्ये तरुणाची हत्या

गो-तस्करीच्या संशयावरून राजस्थानमध्ये तरुणाची हत्या 

वृत्तसंस्था/ जयपूर

गो-तस्करीच्या संशयावरून शनिवारी जमावाने रामगड परिसरातील अलवर येथे तरुणाची दगडाने ठेचून हत्या केली. याप्रकरणी दोघा संशयित आरोपींना अटक करण्यात आली असून, यातील सूत्रधाराचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी ट्विटरच्या माध्यमातून स्पष्ट केले आहे.

हरियाणामधील अकबर खान हा आपल्या मित्रासमवेत जनावरांची वाहतूक करणाऱया वाहनातून जात होता. अलवर येथे ग्रामस्थांनी शुक्रवारी रात्री वाहन अडवले. यावेळी गो-तस्करीच्या संशयावरून जमावाने अकबर खान याला बेदम मारहाण करत दगडाने ठेचले. तो जागीच ठार झाला. याप्रकरणी दोघा संशयित आरोपींना अटक करण्यात आली असून अन्य आरोपींचा शोध  सुरू  असल्याची माहिती जयपूर पोलिसांनी दिली. काही महिन्यांपूर्वी अलवर येथे जमावाकडून हरियाणा येथे जनावरांचे व्यापारी पेहलू खान यांचीही हत्या झाली होती.

काँग्रेसचा भाजपवर हल्लाबोल

जमावाकडून होणाऱया हल्ल्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला फटकारले होते. यानंतरही अलवर येथे जमावाकडून झालेली हत्या धक्कादायक आणि दुर्दैवी घटना आहे, अशा शब्दात काँग्रेसचे सरचिटणीस अशोक गेहलोत यांनी भाजप सरकारवर हल्लाबोल केला. भाजप सरकारच्या काळात संशयावरून नागरिकांच्या हत्या होत आहेत, असा आरोप राजस्थान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सचिन पालयट यांनी केला. ही घटना दुर्दैवी आहे; पण अपवादात्मक घटना नाही. काँग्रेस सत्तेत असतानाही अशाच घटना घडल्या होत्या. 1984 च्या शीख दंगलीतही जमावाकडून आजवरचे सर्वात मोठे सामूहिक हत्याकांड झाले होते, असे प्रत्युत्तर केंद्रीय मंत्री अर्जून राम मेघवाल यांनी दिले आहे.

Related posts: