माशेलात चिखलकाल्याच्या उत्साहात भाविक चिंब

वार्ताहर/ माशेल
माशेल येथील श्री देवकीकृष्ण देवस्थानचा वार्षिक चिखलकाला काल मंगळवारी उत्साहात साजरा करण्यात आला. आषाढी द्वादशीला होणाऱया या चिखलकाल्यात यंदाही ग्रामस्थांनी मोठय़ा संख्येने भाग घेऊन चिखलकाल्याचा मनसोक्त आनंद लुटला. ऐनवेळी पावसाने दडी मारली असली तरी मैदानावर साचलेले पाणी व नंतर पाण्याचा टँकर आणून पाण्याची व्यवस्था करुन हा पारंपरिक उत्सव भक्तिभावाने साजरा करण्यात आला.
बालगोपाळांसह तरुण मंडळी व वयस्क भाविकांनीही चिखलकाल्यात सहभागी होऊन पारंपरिक क्रीडा प्रकारांचा आनंद लुटला.
‘जय विठ्ठल हरि विठ्ठल’
आषाढी एकादशीनिमित्त देवकीकृष्ण मंदिरात चाललेल्या 24 तासांच्या अखंड भजनी सप्ताहाची सांगता झाल्यानंतर चिखलकाल्याला सुरुवात झाली. ‘जय विठ्ठल हरि विठ्ठल’ अशा जयघोषात सर्व भाविक दुपारी मैदानात उतरले. भाविकांकडून नवस फेडल्यानंतर गोपाळगडय़ांवर विविध खाद्यपदार्थ फेकण्यात आले. हे खाद्यपदार्थ मिळविण्यासाठी मोठी झुंबड उडाली.
रंगतदार पारंपरिक खेळ प्रकार
मोठय़ा उत्साहात पारंपरिक क्रीडा प्रकारांना सुरुवात झाली. बेडुक उडय़ा, चेंडू फेक, चक्र, आंधळी कोशिंबीर अशा विविध पारंपरिक खेळ प्रकारांचा त्यात समावेश होता. साधारण दोन तास चाललेल्या या चिखल काल्याची सांगता दही हंडीने झाली. दही हंडी फोडल्यानंतर चिमुलवाडा येथील पारंपरिक विटेवरती आंघोळ करून नंतर सर्व भाविकांच्या उपस्थितीत मंदिरात गाऱहाणे, आरत्या व तीर्थप्रसाद झाला. चिखलकाला पाहण्यासाठी माशेल व आसपासच्या भागातील भाविकांनी मोठी गर्दी केली होती.