|Monday, February 24, 2020
You are here: Home » क्रिडा » बजरंग पुनिया, पिंकी यांना सुवर्ण

बजरंग पुनिया, पिंकी यांना सुवर्ण 

तुर्कीमधील कुस्ती स्पर्धेत भारताला दहा पदके, संदीप तोमर, सीमा, पूजा यांना रौप्य, साक्षीकडून निराशा

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

तुर्कीमधील इस्तंबुल येथे झालेल्या यासर डोगु इंटरनॅशनल कुस्ती स्पर्धेत भारताच्या बजरंग पुनिया व पिंकी यांनी सुवर्णपदके पटकावली तर संदीप तोमरने रौप्यपदक पटकावले. ऑलिम्पिक कांस्यविजेत्या साक्षी मलिककडून मात्र निराशा झाली असून तिला पदकाच्या फेरीपर्यंतही मजल मारता आली नाही. या स्पर्धेत भारताच्या 10 मल्लांनी पदके मिळविली, त्यापैकी 7 महिलांनी मिळविली आहेत.

महिलांच्या विभागात 55 किलो गटात भारताला एकमेव सुवर्ण मिळवून दिले ते पिंकीने. अंतिम लढतीत तिने युपेनच्या ओल्गा श्नायडरचा 6-3 गुणांनी पराभव केला. 62 किलो गटात साक्षी मलिककडून मात्र निराशा झाली. तिला पदकाच्या फेरीपर्यंतही मजल मारता आली नाही. मात्र या स्पर्धेत महिलांनी पुरुषांपेक्षा सरस कामगिरी करीत सात पदके जिंकली.

राष्ट्रकुल चॅम्पियन बजरंग पुनियाला 70 किलो गटातील सुवर्ण मिळविण्यासाठी फारसा घाम गाळावा लागला नाही. कारण अंतिम फेरीतील त्याचा प्रतिस्पर्धी युपेनच्या अँड्री केव्यात्कोवस्कीने दुखापतीमुळे माघार घेतली. त्याचे हे सलग दुसरे आंतरराष्ट्रीय सुवर्णपदक आहे. अलीकडेच जॉर्जियात झालेल्या बिलिसी ग्रां प्रि स्पर्धेतही त्याने सुवर्ण जिंकले होते. 61 किलो गटाच्या अंतिम लढतीत संदीप तोमरला इराणच्या मोहम्मदबाघेर याखकेशीकडून 2-8 अशा गुणांनी पराभव पत्करावा लागल्याने रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. शनिवारी विकीने 57 किलो गटात कांस्यपदक मिळविले होते. इतर भारतीय मल्ल अमित (65 किलो), जितेंद्र (74 किलो), पवन (86 किलो), दीपक (92 किलो), जशकावर सिंग (97 व 125 किलो) यांना पदकाच्या फेरीत पोहोचण्यात अपयश आले.

सीमा, पूजा अंतिम फेरीत पराभूत

अखेरच्या दिवशी महिलांच्या 53 व 57 किलो गटात दोन सुवर्णपदकांच्या लढती होत्या. मात्र सीमा व राष्ट्रकुल रौप्यजेत्या पूजा धांडा यांनी अंतिम फेरीच्या लढती गमवाव्या लागल्याने रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. सीमाला युपेनच्या ख्रिस्टीना बेरेझाने 10-2, तर पूजाला युपेनच्याच इर्नीया खारिव्हने 11-0 असे एकतर्फी हरविले. 62 किलो गटात सरिताने तुर्कीच्या कानसू ऍक्सॉयवर 10-0 असा विजय मिळवित कांस्यपदक पटकावले. याच गटात साक्षी मलिकनेही भाग घेतला होता. पण तिला फक्त पात्रता फेरीतील एक लढत जिंकता आली. उपांत्यपूर्व फेरीत तिला एल्मिरा गॅम्बारोव्हाने चीतपट करून तिचे आव्हान संपुष्टात आणले. यावषी गोल्ड कोस्ट राष्टकुलमध्ये कांस्य जिंकल्यानंतर तिची ही पहिलीच स्पर्धा होती. 72 किलो गटाच्या अंतिम फेरीत तुर्कीच्या बेस्टे ऐतुगने रजनीवर 4-3 अशी मात करून सुवर्ण मिळविले. संगीता फोगट (59 किलो) व गीता यांनीही आपापल्या गटात कांस्यपदके मिळविली.

पूजा व पिंकी यांचा आशियाई क्रीडा स्पर्धेतील पथकात समावेश असून साक्षी व किरण यांचाही या पथकात समावेश आहे. किरणला 76 किलो गटात पदकाची फेरी गाठण्यात अपयश आले होते.

Related posts: