|Monday, September 16, 2019
You are here: Home » मनोरंजन » ललित 205 मधून घेणार नात्यांमधील हरवलेल्या संवादांचा शोध

ललित 205 मधून घेणार नात्यांमधील हरवलेल्या संवादांचा शोध 

कवयित्री विमल लिमये यांची घर असावे घरासारखे… नकोत नुसत्या भिंती… तिथे असावा प्रेम जिव्हाळा… नकोत नुसती नाती… ही कविता प्रसिद्ध आहे. या कवितेतील विचार खरा करणारी, नात्यांतील हरवलेल्या संवादाचा शोध घेणारी मालिका ललित 205 स्टार प्रवाह घेऊन येत आहे. ही मालिका 6 ऑगस्टपासून रात्री 8.30 वाजता पाहता येणार आहे.

 पैठणीचा पारंपरिक व्यवसाय असलेल्या राजाध्यक्ष कुटुंबाची गोष्ट या मालिकेतून उलगडणार आहे. या कुटुंबाची प्रमुख आहे आजी… कुटुंबातील दुभंगलेली मनं जोडण्यासाठी सुमित्रा राजाध्यक्ष कसे आणि काय काय प्रयत्न करतात याचं चित्रण या मालिकेत करण्यात आलं आहे. आजच्या काळात एकत्र कुटुंब पद्धत विरळ होत चालली आहे. त्यातही आजीचा सहवास लाभणं दुर्मीळ होतंय. या पार्श्वभूमीवर आपल्या पुढच्या पिढय़ांना, आपल्या कुटुंबाला जोडून ठेवणाऱया आजीची धडपड असलेलं कथानक हे या मालिकेचं वैशिष्टय़ ठरणार आहे. अग्निहोत्रनंतर बऱयाच वर्षांनी सुहास जोशी स्टार प्रवाहची सीरिअल करत आहेत. या मालिकेविषयी सांगताना त्या म्हणाल्या, ही एक कौटुंबिक मालिका आहे. मी साकारत असलेली आजी तुम्हाला तुमच्या आजीची नक्कीच आठवण करून देईल याचा मला विश्वास आहे. या मालिकेविषयी स्टार प्रवाहच्या कार्यक्रम प्रमुख श्रावणी देवधर म्हणाल्या… स्पर्धात्मक युगात टिकून राहण्यासाठी आपली सतत धडपड असते. शर्यतीत अव्वल राहण्याच्या प्रयत्नात आपण आपली नाती मात्र विसरत चाललोय. याचा विसर पडलेल्या नात्यांची आठवण करून देणारी ही मालिका असेल. आदेश बांदेकर यांच्या सोहम प्रॉडक्शनने या मालिकेची निर्मिती केली आहे. आदेश बांदेकर यांचा सुपुत्र सोहम बांदेकर या मालिकेच्या निमित्ताने पहिल्यांदाच निर्माता म्हणून समोर येणार आहे. ललित 205 मध्ये सुहास जोशी, सागर तळाशीकर, धनश्री दवांगे, संग्राम समेळ, अमफता पवार, अनिकेत केळकर, कीर्ती मेहेंदळे, अमोघ चंदन, मानसी नाईक अशी उत्तम स्टारकास्ट आहे. शिरीष लाटकर या मालिकेचं लेखन करत आहेत.