|Sunday, January 26, 2020
You are here: Home » आवृत्ती » सांगली » कर्जासाठी शेतकरी आत्महत्त्या करताना बडय़ा उद्योगपतींना मात्र कर्जमाफी

कर्जासाठी शेतकरी आत्महत्त्या करताना बडय़ा उद्योगपतींना मात्र कर्जमाफी 

सरकारकडून केवळ घोषणाच अंमलबजावणी नाही : सीताराम येचुरी यांचे सरकारवर टीकास्त्र

प्रतिनिधी/ विटा

पंतप्रधान नरेंद्र मोदी दररोज नवीन घोषणा करीत आहेत. प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी होत नाही. धर्माच्या नावावर देशात फूट पाडण्याचे प्रयत्न होत आहेत. त्याला विरोध करण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. कर्जासाठी शेतकरी आत्महत्त्या करीत असताना सरकार बडय़ा उद्योगपतींचे कर्ज माफ करीत आहे, अशी टीका करीत अशावेळी देशाला क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रतिसरकार चळवळीची गरज आहे, असे मत भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सचिव  सीताराम येचुरी यांनी व्यक्त केले.

येथील क्रांतिसिंह नाना पाटील लोकविद्यापीठाचा ’क्रांतिसिंह नाना पाटील सामाजिक पुरस्कार’ सीताराम येचुरी यांना ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे यांच्याहस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी येचुरी बोलत होते. व्यासपीठावर  अशोक ढवळे, क्रांतिवीरांगणा हौसाताई पाटील, डॉ. बाबुराव गुरव यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी येचुरी यांनी केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली. स्वागत आणि प्रास्ताविक लोकविद्यापीठाचे संघटक ऍड. सुभाष पाटील यांनी केले.

येचुरी म्हणाले, काही सिनेमे तीन तास प्रेक्षकांना विचार करायला वेळ न देता संपतात. तशाच पद्धतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रत्येक दिवशी प्रत्येक घोषणा करीत आहेत. मेक इन इंडिया, स्टार्ट अप इंडिया, स्टँड अप इंडिया, स्टेप अप इंडिया, आशा घोषणा केल्या जात आहेत. प्रत्यक्षात मात्र याची अंमलबजावणी न होता, जनतेची फसवणूक केली जात आहे. महाराष्ट्र सरकार मराठय़ांना आरक्षण देण्याची भाषा करत असताना त्याचवेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नोकऱयाच नाहीत, तर आरक्षण का मागता?, असे सांगत आहेत. तर भाजप अध्यक्ष अमित शहा हे नोकरी व रोजगार हवा असेल तर पकोडे तयार करा, अशी तरुणांची खिल्ली उडवत आहेत, अशी टीका येचुरी यांनी केली.

संविधान बदलण्याचा प्रयत्न : येचुरी

धर्माच्या नावाखाली जातीपातीत भांडणे लावून देशाचे तुकडे करण्याचा या सरकारचा डाव असल्याची टीका येचुरी यांनी केली. क्रांतिसिंह नाना पाटील यांच्यासारख्या हुतात्म्यांच्या बलिदानातून देशाला ब्रिटीश सरकारपासून मुक्तता मिळाली. स्वातंत्र्याचा हेतू हा संविधानात उघड आहे. ‘आम्ही लोक’ असा उदात्त अर्थ असताना आणि त्यातून एकसंघतेची भावना अभिप्रेत असताना संविधान बदलण्याचा एक प्रकारे प्रयत्न सुरू आहे. अशावेळी संविधान वाचविण्याचे महत्वपूर्ण काम आपणा सर्वांना एकत्रितपणे करावे लागणार आहे. संविधान चार मुख्य स्तंभावर आधारलेले आहे. त्यांना कमजोर करण्याचे काम केले जात आहे, अशी टीका येचुरी यांनी केली.

‘धर्माच्या नावावर फूट पाडण्याचा प्रयत्न नको’

आम्ही ‘जय हिंद’ ही घोषणा देऊ शकतो. क्रांतिकारकांच्या ‘इनक्लाब’चा जयघोष करू शकतो. परंतु आता काय म्हणायचे अथवा कशाचा जयघोष करायचा याचीही जबरदस्ती केली जात आहे. देशातील वेगवेगळ्या जाती-धर्मांना भारतीय हा एकच शब्द एकत्रित जोडतो. त्यामुळे धर्माच्या नावावर फूट पाडण्याचा प्रकार कोणी करू नये, असा इशारा येचुरी यांनी दिला.

‘क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या चळवळीची गरज’

देशात दलितांवरील अत्याचार वाढत आहेत. शेतकरी आंदोलन, संप करीत आहेत. कर्ज बाजारीपणामुळे देशाचा अन्नदाता शेतकरी आत्महत्या करीत आहे. शेतकरी आत्महत्या करताना सरकार मात्र या उद्योगपतींचे तीन लाख कोटी रुपयांचे कर्ज माफ करते, ही शोकांतिका आहे. आता पेटून उठून सर्वांनी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या विचाराने प्रेरित होऊन काम केले पाहिजे. क्रांतिसिंह यांनी ‘प्रतिसरकार’ चळवळ उभी केली. त्याची आज नितांत गरज असल्याचेही  येचूरी यांनी सांगितले.

चळवळीला प्रेरणा देणारा पुरस्कार : डॉ. साळुंखे

डॉ. आ. ह. साळुंखे म्हणाले, डाव्या चळवळीत काम करणारे लोक आक्रमक असतात. परंतू याला सीताराम येचुरी हे अपवाद आहेत. अत्यंत शांत आणि संयमीपणे ते प्रश्न मांडतात. त्यामुळे त्यांच्याबद्दल आदर असून क्रांतिसिंह नाना पाटील यांच्यासारख्या शेतकऱयांची भाषा समजणाऱया रांगडय़ा व्यक्तिमत्वाच्या नावाने त्यांना दिला जाणारा पुरस्कार हा चळवळीच्या कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी ठरणारा आहे.

सरकार विरोधात एकसंघ व्हा : ढवळे

अशोक ढवळे म्हणाले, मराठा आरक्षणाला आमच्या पक्षाचा पाठिंबा आहे, मात्र हिंसेने प्रश्न सुटत नाहीत. सनदशीर मार्गाने लढा दिला पाहिजे. आंदोलने कशी करायची?, याचे उदाहरण किसान सभेच्या शेतकरी लॉंग मार्चने दाखवून दिले आहे. सरकार विरोधात अशीच आंदोलने करण्यासाठी एक संघ व्हावे, असे आवाहन ढवळे यांनी केले.

यावेळी लोकविद्यापीठाचे अध्यक्ष भाई सुभाष पवार, ऍड. अजित सूर्यवंशी, ऍड. नानासाहेब पाटील, प्रा. पांडुरंग शितोळे, ऍड. स्वाती पाटील, इंद्रजीत पाटील, प्रा. स्नेहल पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

Related posts: