|Thursday, September 19, 2019
You are here: Home » क्रिडा » बेअरस्टो-वोक्सच्या भागीदारीमुळे इंग्लंड सुस्थितीत

बेअरस्टो-वोक्सच्या भागीदारीमुळे इंग्लंड सुस्थितीत 

चहापानाअखेर यजमान संघाच्या 5 बाद 230 धावा

वृत्तसंस्था/ लंडन

जॉनी बेअरस्टो व ख्रिस वोक्स यांनी सहाव्या गडय़ासाठी 99 धावांची दणकेबाज भागीदारी साकारल्यानंतर इंग्लंडने भारताविरुद्ध दुसऱया कसोटी सामन्याच्या तिसऱया दिवशी चहापानाअखेर 5 बाद 230 अशी सुस्थिती प्राप्त केली. चहापानासाठी खेळ थांबवण्यात आला, त्यावेळी बेअरस्टो 98 चेंडूत 8 चौकारांसह 62 तर ख्रिस वोक्स 73 चेंडूत 8 चौकारांसह 55 धावांवर नाबाद राहिले. या उभयतांच्या भागीदारीमुळे इंग्लंडने 5 गडी हाताशी असताना भारतावर 123 धावांची आघाडी घेतली.

उपाहारानंतर बेअरस्टो व बटलर (24) यांनी पाचव्या गडय़ासाठीची भागीदारी 42 धावांपर्यंत नेली. इंग्लंडने 27 षटकादरम्यान 100 धावांचा टप्पा पार केला. मोहम्मद शमी (3-67) व इशांत शर्मा (1-66) यांनी काही उत्तम स्पेल टाकले. बेअरस्टो व बटलर यांनी अनेक दर्जेदार फटके लगावले. त्याचप्रमाणे त्यांच्याकडून काही चुकाही झाल्या. विशेषतः फटके मारण्यात घाई करणारा बेअरस्टो बऱयाचदा बचावला. काही वेळा बॅटने चेंडूची कड घेतली होती. पण, चेंडू यष्टीवर न आदळल्याने बेअरस्टो सुदैवी ठरला. भारतीय संघातर्फे अखेर शमीने ही कोंडी फोडली. त्याने 32 व्या षटकात बटलरला पायचीत करत ही भागीदारी संपुष्टात आणली. भारताला त्यावेळी अजूनही सामन्यात परतण्याची संधी होती.

बेअरस्टो-वोक्सची डोकेदुखी

अर्थात, त्यानंतर बेअरस्टो-वोक्स ही जोडी जमली आणि या दोघांनी हा सामना भारतापासून आणखी दूर नेण्याची जबाबदारी अगदी चोख पार पाडली. मोहम्मद शमी व इशांत शर्मा यांना तिसरा तिसरा फुल टाईम मध्यमगती गोलंदाजाची साथ नसणे भारताला फटका देणारे ठरले. हार्दिक पंडय़ाने (1-38) थोडेफार प्रयत्न केले. पण, त्यात फारसा दम नव्हता. जादा फिरकीपटू या नात्याने संघात स्थान लाभलेल्या कुलदीप यादवला (0-28) तर इंग्लिश फलंदाजांनी अगदी सहजतेने खेळून काढले.

बेअरस्टोचे 19 वे अर्धशतक

बेअरस्टोने यादरम्यान 76 चेंडूत कसोटी कारकिर्दीतील 19 वे अर्धशतक साजरे केले. त्यानंतर काहीच मिनिटात वोक्सने देखील 71 चेंडूत आपले पाचवे कसोटी शतक फलकावर लावले. इंग्लंडने 49 व्या षटकादरम्यान 200 धावांचा टप्पा सर केला. भारताचा आघाडीचा फिरकीपटू रविचंद्रन अश्विन या डावात अगदीच निष्प्रभ ठरला. त्याला 7 षटकात 23 धावा दिल्यानंतर देखील अगदी एकही ब्रेकथू मिळवता आला नाही. पण, आश्चर्याची बाब म्हणजे त्याला येथे फारशी षटकेही दिली गेली नाहीत. एकदा इंग्लंडने 100 धावांची आघाडी घेतल्यानंतर भारतीय खेळाडूंनी जणू खांदेच टाकले आणि याचा बेअस्टो व ख्रिस वोक्स यांनी विशेष लाभ घेतला. या जोडीने अगदी सहज फटकेबाजी करत चहापानापर्यंत आरामात किल्ला लढवला. शिवाय, या लढतीत आपली आघाडी 123 धावांपर्यंतही पोहोचवली.

उपाहारावेळी मात्र 4 बाद 89

उपाहारानंतर अगदी सहजपणे खेळणाऱया इंग्लंडला उपाहारापूर्वी मात्र चांगलेच झगडावे लागले होते. ब्रेकसाठी खेळ थांबला, त्यावेळी त्यांची 4 बाद 89 अशी अवस्था झाली होती. पहिल्या सत्रात स्वच्छ सुर्यप्रकाश असताना विशेषतः मोहम्मद शमीने याचा चांगला लाभ करुन घेतला. डावातील 8 व्या षटकातच त्याने जेनिंग्सला 11 धावांवर पायचीत केले तर कूक पुन्हा एकदा अपयशी ठरला. त्याने इशांतच्या गोलंदाजीवर कार्तिककडे झेल दिला. त्याला 25 चेंडूत 21 धावा जमवता आल्या. त्याच्या खेळीत 4 चौकारांचा समावेश राहिला. अनुभवी रुटला 19 धावांवर परतावे लागले. तो शमीच्या गोलंदाजीवर पायचीत झाला.

पदार्पणवीर ऑलिव्हिएर पोप पंडय़ाचा सावज ठरला. त्याने पायचीत होण्यापूर्वी 38 चेंडूत 28 धावांचे योगदान दिले. जोस बटलरलाही शमीने 24 धावांवर पायचीत केले. त्यानंतर मात्र बेअरस्टो व वोक्स या जोडीने भारतीय गोलंदाजांना चांगलेच सतावले होते.

धावफलक

भारत पहिला डाव : सर्वबाद 107.

इंग्लंड पहिला डाव : ऍलिस्टर कूक झे. कार्तिक, गो. शर्मा 21 (25 चेंडूत 4 चौकार), केटॉन जेनिंग्स पायचीत गो. शमी 11 (22 चेंडू), जो रुट पायचीत गो. शमी 19 (53 चेंडूत 2 चौकार), ऑलिव्हिएर पोप पायचीत गो. पंडय़ा 28 (38 चेंडूत 3 चौकार), जॉनी बेअरस्टो खेळत आहे 62 (98 चेंडूत 8 चौकार), जोस बटलर पायचीत गो. शमी 24 (22 चेंडूत 4 चौकार), ख्रिस वोक्स खेळत आहे 55 (73 चेंडूत 8 चौकार). अवांतर 10. एकूण 55 षटकात 5/230.

गडी बाद होण्याचा क्रम

1-28 (जेनिंग्स, 7.3), 2-32 (कूक, 8.2), 3-77 (पोप, 21.2), 4-89 (रुट, 24.4), 5-131 (बटलर, 31.1).

गोलंदाजी

इशांत शर्मा 16-3-66-1, मोहम्मद शमी 16-3-67-3, कुलदीप यादव 6-1-28-0, हार्दिक पंडय़ा 10-0-38-1, अश्विन 7-1-23-0.