|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » उद्योग » पीव्हीआरकडून एसपीआय सिनेमाजचे अधिग्रहण

पीव्हीआरकडून एसपीआय सिनेमाजचे अधिग्रहण 

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

एसपीआय सिनेमाज्मधील 71.7 टक्के हिस्सा खरेदीसाठी सहमती झाल्याचे पीव्हीआरकडून सांगण्यात आले. दोन्ही कंपन्यांमध्ये 633 कोटी रुपयांसाठी व्यवहार झाला आहे. दक्षिण भारतातील सर्वात मोठे चित्रपटगृहांचे जाळे एसपीआयकडे आहे. यामुळे देशातील सर्वात मोठय़ा मल्टिप्लेक्स कंपनीला दक्षिण भारतामध्ये आपले स्थान मजबूत करण्याची संधी मिळणार आहे. याव्यतिरिक्त पीव्हीआर जगातील सातव्या क्रमांकाची सिनेमागृहांची संख्या असणारी कंपनी ठरणार आहे.

हे अधिग्रहण पूर्ण झाल्यानंतर पीव्हीआरकडे 60 शहरांत 152 ठिकाणी असणाऱया स्क्रीन्सची संख्या 706 वर पोहोचेल. यापूर्वी 2016 मध्ये पीव्हीआरने डीटी सिनेमाज् आणि 2013 मध्ये सिनेमॅक्सची खरेदी केली होती. चेन्नईमध्ये मुख्यालय असणाऱया एसपीआय सिनेमाज्कडे 10 शहरातील 17 ठिकाणी 76 स्क्रीन्स आहेत. यामध्ये मुंबई, कर्नाटक, केरळ, आंध्रप्रदेश, तामिळनाडू, तेलंगाणा यांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त 100 स्क्रीन्स सुरू करण्याचा कंपनीचा विचार आहे. दोन्ही कंपन्यांतील व्यवहार पुढील महिनाभरात पूर्ण होईल. यानंतर दक्षिण भारतातील कंपनीचा वाटा 26 वरून 35 टक्क्यांवर पोहोचेल. एसपीआय सिनेमाज्चे गेल्या आर्थिक वर्षातील उत्पन्न 310 कोटी रुपये होते.

या व्यवहारानंतर एसपीआयचे किरण रेड्डी आणि स्वरुप रेड्डी व्यवसायामध्ये कायम राहणार असून पीव्हीआरला रणनितीक मागदर्शन करतील असे कंपनीने म्हटले.