|Tuesday, July 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » खाबुगिरी प्रवृत्तीला आळा घालण्याची गरज

खाबुगिरी प्रवृत्तीला आळा घालण्याची गरज 

प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डींग हाऊसचे संचालक प्रा. विनय पाटील यांचे मत

प्रतिनिधी/ कोल्हापूर

कार्पोरेट क्षेत्रासह शासकीय, निमशासकीय आणि शिक्षण क्षेत्रातही पैसे दिल्याशिवाय कोणतेही काम होत नाही. त्यामुळे पैसे मिळवण्याची मानसिकता बदलून खाबुगिरी प्रवृत्तीला आळा घालण्याची गरज आहे, असे मत प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डींग हाऊसचे संचालक प्रा.विनय पाटील यांनी व्यक्त केले.

ग्रंथ कॉर्नर, वाचनकट्टा बहुउद्देशिय संस्था आणि मनोविकास प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित निलांबरी जोशी लिखित ‘कार्पोरेट कल्लोळ’ या पुस्तक प्रकाशन सोहळय़ात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. शाहू स्मारक येथे झालेल्या प्रकाशन सोहळय़ानंतर लेखिका निलांबरी जोशी आणि मानसोपचारतज्ञ डॉ. गुरूदास हर्षे यांच्याशी उपस्थितांनी संवाद साधला.

प्रा. पाटील म्हणाले, कार्पोरेट जगतात युवा पिढी पॅकेजशी स्पर्धा करीत आहेत. त्यामुळे पदवीधरपेक्षा अभियंत्यांची संख्या वाढत आहे. परिणामी नोकरीच्या संधी फारच कमी होत आहेत, त्यामुळे हे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून विविध पदावर रूजू होताना दिसत आहेत. औद्योगिक क्षेत्राला अपेक्षीत असे शिक्षण दिले जात नाही, हा शिक्षण पध्दतीमधील दोष आहे. त्यामुळे ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या स्वप्नातील भारत साकारणे अशक्यप्राय दिसत आहे. या पुस्तकातून मानसोपचार तज्ञांप्रमाणे समाज वाचवण्याचे काम केले आहे.

लेखिका निलांबरी जोशी आपल्या पुस्तकाविषयी बोलताना म्हणाल्या, कामाच्या ठिकाणी विविध कारणाने ताणतणाव निर्माण होतात. त्यामुळे कर्मचाऱयांमध्ये अस्वस्थता वाढण्याचे प्रमाण जास्त आहे.  वरिष्ठांनी कर्मचाऱयांशी खेळीमेळीने वागले पाहिजे.  एखादे दु:ख व्यक्त करता येत नसेल तर नैराश्य येते. यातून संबंधीत व्यक्ती अंतर्मुख होवून एखादा अनर्थ घडण्याचीही शक्यता असते. म्हणून या पुस्तकातून कार्पोरेट ट्रेनिंग, वेतनवाढ, कामगारांचे आजार व अपघात, कामगार कायदे, प्रशिक्षण घेण्याचे नियोजन, आधुनिक बदल स्वीकारण्याची गरज आहे, अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत.

यावेळी प्रा. टी. के. सरगर, युवराज कदम, सुभाष पाटील, आशिष पाटकर, डॉ. गुरूदास हर्षे, अरूण नाईक, आदी उपस्थित होते.