|Friday, November 15, 2019
You are here: Home » विशेष वृत्त » एशियन गेम्समध्ये ‘सुवर्ण’कामगिरी करणाऱया रोव्हर्सचे जल्लोषात स्वागत

एशियन गेम्समध्ये ‘सुवर्ण’कामगिरी करणाऱया रोव्हर्सचे जल्लोषात स्वागत 

पुणे / प्रतिनिधी :

फुलांनी सजविलेला ट्रक…पारंपरिक वाद्यांचा गजर…सेल्फीसाठी आणि खेळाडूंशी शेकहँड करण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांची चाललेली धावपळ…चौकाचौकात ‘भारत माता की जय’ देण्यात आलेल्या घोषणा अशा उत्साहमय वातावरणात पुणेकरांनी एशियन गेम्स 2018 मध्ये रोईंग स्पर्धेतील सुवर्णपदक आणि कांस्यपदक विजेत्या रोव्हर्सचे शनिवारी स्वागत केले.

महाराष्ट्राच्या दत्तू भोकनळ सोबत सेल्फी काढण्यासाठी आणि त्याचा ऑटोग्राफ घेण्यासाठी क्रीडाप्रेमींनी एकच गर्दी केली होती. भारताच्या संघातील सुवर्णपदक विजेत्या स्वर्ण सिंग, दत्तू भोकनळ, ओम प्रकाश, सुखमीत सिंह तसेच कांस्यपदक विजेते रोहीत कुमार, भगवान सिंह, दुष्यंत आणि त्यांचे प्रशिक्षक रॅलीमध्ये सहभागी झाले होते. चौकाचौकात पुणेकरांनी खेळाडूंचे स्वागत करीत भारत माता की जय च्या घोषणा दिल्या.

महाराष्ट्र रोईंग असोसिएशन, महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक संचलनालय आणि कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग यांच्या संयुक्त विद्यमाने, जकार्ता येथे झालेल्या एशियन गेम्समध्ये सुवर्णपदकाची कमाई केलेल्या खेळाडूंच्या सन्मानार्थ ढोल -ताशांच्या गजरात जंगली महाराज रस्त्यापासून रॅली काढण्यात आली. यावेळी महाराष्ट्र ऑलिम्पकि असोसिएशनचे चंद्रकांत शिरोळे, किर्लोस्करचे राजेंद्र देशपांडे, जिल्हा क्रीडा अधिकारी विजय संतान,अनिल चोरमुले, महाराष्ट्र रोईंग असोसिएशनच्या सचिव मृदुला कुलकर्णी, सहसचिव संजय वळवी, खजिनदार क्रिष्णानंद हेबळेकर, नरेंद्र कोठारी, स्मिता यादव, मुजीद रहेमान,श्रीकांत हरनाळे, चनबस स्वामी यावेळी उपस्थित होते.

सकाळी 11 वाजता जंगली महाराज मंदिरापासून ढोल-ताशांच्या गजरात रॅलीला सुरुवात झाली. मॉडर्न हायस्कूलचे विद्यार्थी रॅलीमध्ये सहभागी झाले होते. जंगली महाराज मंदिर, बालगंधर्व रंगमंदिर, डेक्कन जिमखाना, फर्ग्युसन महाविद्यालय, ज्ञानेश्वर पादुका चौक, आणि शिवाजीनगर असा रॅलीचा मार्ग होता. रॅलीनंतर कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या सभागृहात रोव्हर्सचा सत्कार करण्यात आला.

दत्तू भोकनळ म्हणाला, एक वर्षापासून स्पर्धेसाठी सराव सुरु होता. डबल इव्हेंट करत असल्यामुळे सराव खूप वेगळा आणि यावषीचा सराव जास्त कठीण होता. आधी 20 किलोमीटर सराव करायचो, परंतु स्पर्धेसाठी 40 किलोमीटर सराव केला. वैयक्तिक पदक मिळविण्यात अपयशी ठरलो परंतु, सांघिकमध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून दिल्याचा आनंद आहे. आता 2020 चे ऑलिम्पिक हेच लक्ष्य आहे, असेही त्यांनी सांगितले.

 

 

 

Related posts: