|Thursday, January 23, 2020
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » हसत-खेळत शिक्षणासाठी ज्ञानरचनावाद वर्गखोलीची स्थापना

हसत-खेळत शिक्षणासाठी ज्ञानरचनावाद वर्गखोलीची स्थापना 

प्रतिनिधी/ बेळगाव

मोत्यांच्या माळा, मुळाक्षरांचे पत्ते, कांडय़ांचे शब्द, मण्यांचे अंक, कागदी प्राणी-पक्षी अशा आगळय़ावेगळय़ा वर्गात हसत-खेळत गणितीय क्रिया करणारे विद्यार्थी, शब्दखेळ, अक्षरखेळ, अंकखेळ अशा छोटय़ा-छोटय़ा खेळातून शिक्षण घेणारे बालचमू. हे चित्र कोणत्या मॉडेल शाळेचे नसून हे चित्र आहे अळवण गल्ली, शहापूर येथील सरकारी शाळा क्र. 19 या मराठी शाळेचे. मराठी शाळा टिकविण्यासाठी माजी विद्यार्थ्यांच्या संकल्पनेतून या ज्ञानरचनावाद वर्गखोलीची संकल्पना साकारण्यात आली आहे.

शनिवारी या ज्ञानरचनावाद वर्गखोलीचे उद्घाटन करण्यात आले. 1999-2000 बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी शाळा सुधारणा कृती समितीच्या माध्यमातून ही संकल्पना साकारली आहे. या वर्गखोलीचे उद्घाटन उपमहापौर मधुश्री पुजारी, माजी नगरसेवक दीपक वाघेला, माजी विद्यार्थी राजू माळवदे, एसडीएमसी अध्यक्ष कृष्णा देसाई यांच्या उपस्थितीत पार पडले. प्रारंभी फीत कापून वर्गखोलीचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले. यावेळी देवेंद्र पाटील, संजीव कागळे उपस्थित होते.

स्वागत व प्रास्ताविक माजी विद्यार्थी वृषाली घाडी यांनी केले. यानंतर उपमहापौर  मधुश्री पुजारी यांच्या हस्ते सरस्वती पूजन करून दीपप्रज्वलन करण्यात आले.

 माजी नगरसेवक दीपक वाघेला यांनी शाळेचा इतिहास कथन केला. प्रारंभी उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. याबरोबरच या उपक्रमासाठी सातत्याने कार्यरत असणाऱया वृषाली घाडी, श्रीकांत कदम आणि सचिन तिळवेकर यांचा सर्व माजी विद्यार्थ्यांच्यावतीने उपमहापौरांनी सत्कार केला.

यावेळी माजी विद्यार्थी सूरज कुडूचकर, सचिन तेळवेकर, संतोष कृष्णाचे, किरण हुद्दार, विनायक कावळे, हरीष वाघमोडेकर, शुभम शेळके, अभय सावंत, शशिकांत कदम, व्यंकटेश पाटील तसेच एसडीएमसी उपाध्यक्षा रेश्मा भाकोजी, सदस्य, पालकवर्ग, माजी विद्याथीं व शिक्षक उपस्थित होते.

दोन महिन्यांच्या कालावधीत वर्गखोलीचे काम पूर्ण

1962 सालच्या या मराठी शाळेला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी विद्यार्थ्यांना हसत-खेळत शिक्षण मिळावे म्हणून माजी विद्यार्थ्यांनी ज्ञानरचनावाद या वर्गखोलीची स्थापना केली आहे. 15 हजार रुपये खर्चातून आणि माजी विद्यार्थ्यांच्या परिश्रमातून दोन महिन्यांच्या कालावधीत वर्गखोलीचे काम पूर्ण करण्यात आले आहे. संपूर्ण वर्गाला रंगकाम करून फरशीवर गणितीय क्रिया, शब्दांचे खेळ, इंग्रजी शब्द खेळ रेखाटण्यात आले आहेत. यामुळे मणी, मोती, खडे, काडय़ा, अक्षरे यांच्या माध्यमातून मराठी, इंग्रजी, गणित विषयातील प्राथमिक संकल्पना विद्यार्थ्यांना अचूकरित्या करता येणार आहेत. पुढील काळात माजी विद्यार्थ्यांनी शाळेत युकेजी व एलकेजीचे वर्ग काढण्याचे आणि शाळेच्या रंगकामाचे उद्दिष्ट समोर ठेवले आहे.

 

 

 

 

Related posts: