|Wednesday, January 29, 2020
You are here: Home » क्रिडा » स्टीफेन्स, सेरेना, प्लिस्कोव्हा उपांत्यपूर्व फेरीत

स्टीफेन्स, सेरेना, प्लिस्कोव्हा उपांत्यपूर्व फेरीत 

अमेरिकन ग्रँडस्लॅम : नदाल, डेल पोट्रो, थिएम, इस्नेर यांचीही आगेकूच

वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क

अग्रमानांकित राफेल नदाल, माजी अग्रमानांकित सेरेना विल्यम्स, डॉमिनिक थिएम, जुआन मार्टिन डेल पोट्रो, जॉन इस्नेर, कॅरोलिना प्लिस्कोव्हा, विद्यमान विजेती स्टीफेन्स यांनी अमेरिकन ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली तर कॅनडाचा मिलोस रेऑनिक, केविन अँडरसन, ऍश्ले बार्टी, काया कॅनेपी, स्विटोलिना यांचे आव्हान संपुष्टात आले.

स्पेनच्या नदालने जॉर्जियाच्या निकोलोझ बेसिलाश्विलीचा 6-3, 6-3, 6-7 (6-8), 6-4 असा पराभव केला. जागतिक अग्रमानांकित नदाल हा सामना सहज जिंकेल असे वाटले होते. पण दोन सेट्स गमविल्यानंतर निकोलोझने आपला खेळ उंचावत तिसरा सेट जिंकून थोडीशी चुरस निर्माण केली. मात्र नदालने चौथ्या सेटमध्ये मॅचपॉईंटवर सातवी बिनतोड सर्व्हिस करीत सामना संपविला. तीन तास 20 मिनिटे ही लढत रंगली होती. दोन दिवसांपूर्वी रशियाच्या कॅरेन खचानोव्हनेही नदालला झुंजवले होते. नदालने निकोलोझच्या खेळाचेही कौतुक केले. नदालची पुढील लढत डॉमिनिक थिएमशी होणार आहे.

इस्नेरचा रेऑनिकला धक्का

तिसऱया मानांकित डेल पोट्रोने क्रोएशियाच्या 20 व्या मानांकित बोर्ना कोरिकचा 6-4, 6-3, 6-1 असा फडशा पाडत आगेकूच केली. त्याची उपांत्यपूर्व लढत अमेरिकेच्या जॉन इस्नेरशी होईल. एकतर्फी झालेल्या या सामन्यात डेल पोट्रोने 9 बिनतोड सर्व्हिस केल्या व 33 विजयी फटके मारले. डेल पोट्रोने ही स्पर्धा 2009 मध्ये जिंकली होती. 11 क्या मानांकित इस्नेरने पाच सेट्सच्या झुंजार लढतीत कॅनडाच्या रेऑनिकला पराभवाचा धक्का दिला. त्याचा हा या स्पर्धेतील पाच सेट्स चाललेला दुसरा सामना होता. इस्नेरने रेऑनिकवर 3-6, 6-3, 6-4, 3-6, 6-2 अशी मात केली. साडेतीन तास रंगलेल्या या सामन्यात इस्नेरने एकूण 56 विजयी फटके मारले व 20 बिनतोड सर्व्हिस केल्या.

थिएमची अँडरसनवर मात

नवव्या मानांकित डॉमिनिक थिएमने पहिले ग्रँडस्लॅम मिळविण्याच्या स्वप्नाच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकताना मागील वर्षीचा उपविजेता केविन अँडरसनचा 7-5, 6-2, 7-6 (7-2) असा पराभव केला. या स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठण्याची त्याची ही पहिलीच वेळ आहे. ‘सर्वोत्तम सामन्यापैकी एक असा हा सामना असून उपांत्यपूर्व फेरी गाठल्याने स्वप्न साकारत असल्याची भावना मनात आहे,’ असे तो सामन्यानंतर म्हणाला. थिएम हा या वषीचा फ्रेंच ओपनचा उपविजेता आहे. थिएम-अँडरसन यांच्यात याआधी सहा लढती झाल्या होत्या आणि त्या सर्व अँरडसनने जिंकल्या होत्या.

सेरेनाचा संघर्ष, स्विटोलिना पराभूत

महिला एकेरीत सेरेना विल्यम्सने उपांत्यपूर्व फेरी गाठली. पण तिला विजयासाठी संघर्ष करावा लागला. जायंट किलर काया कॅनेपीवर तिने 6-0, 4-6, 6-3 अशी मात करून 24 वे ग्रँडस्लॅम पटकावण्याच्या दिशेने आगेकूच केली. शेवटच्या आठमध्ये स्थान मिळविण्याची तिची ही 15 वी वेळ आहे. कॅनेपीने पहिल्या फेरीत जागतिक अग्रमानांकित हॅलेपला धक्का दिला होता. सेरेनाची उपांत्य लढत आठव्या मानांकित प्लिस्कोव्हाशी होईल. झेकच्या प्लिस्कोक्हाने ऑस्ट्रेलियाच्या 18 व्या मानांकित ऍश्ले बार्टीचा 6-4, 6-4 असा पराभव केला. प्लिस्कोव्हाने यापूर्वी 2016 मध्ये सेरेनाचा पराभव करून या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती. विद्यमान विजेती व तिसरी मानांकित स्लोअन स्टीफेन्सनेही उपांत्यपूर्व फेरी गाठली असून तिने बेल्जियमच्या एलिस मर्टेन्सचा 6-3, 6-3 असा पराभव केला. तिची उपांत्यपूर्व लढत लॅटव्हियाच्या ऍनास्तेशिया सेवास्तोव्हाशी होईल. सेवास्तोव्हाने सातव्या मानांकित एलिना स्विटोलिनाला 6-3, 1-6, 6-0 असा पराभवाचा धक्का दिला. गेल्या वषी स्टीफेन्स व सेवास्तोव्हा यांच्यात उपांत्यपूर्व फेरीतच गाठ पडली होती आणि स्टीफेन्सने त्यावेळी विजय मिळविला होता.

 

 

Related posts: