|Sunday, December 15, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » अभिनय उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शिक्षण

अभिनय उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शिक्षण 

महादेव गवंडी/ पेडणे

पाठय़पुस्तकातील अभ्यासक्रम केवळ वर्गात न शिकवता तो प्रत्यक्ष अनुभण्याची संधी पेडणे तालुक्यातील सरकारी प्राथमिक विद्यालयात शिक्षण घेणाऱया विद्यार्थ्यांना मिळते आहे. पेडणे तालुका शिक्षणाधिकारी नरेंद्र नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली हा अभिनय उपक्रम सध्या पेडणे तालुक्यात अधोरेखित होत असून सरकारी शाळांनी यानिमित्ताने आम्ही एक पाऊल पुढे असल्याचे दाखवून दिले आहे.

कोरगाव भटवाडी येथील सरकारी प्राथमिक विद्यालय, भालखाजन येथील सरकारी प्राथमिक विद्यालय, मानशीवाडा येथील सरकारी प्राथमिक विद्यालय व पेडणे पालिका क्षेत्रातील पराष्टे सरकारी प्राथमिक विद्यालय अशा चार विद्यालयांचे एकूण 50 विद्यार्थी या अभिनय उपक्रमात सहभागी झाले होते. शैक्षणिक साहित्यांचा वापर करत विद्यार्थ्यांना अध्ययन करण्याची पद्धत आता सर्वश्रृत आहे. त्याही पुढचा विचार करून पेडणेचे शिक्षणाधिकारी नरेंद्र नाईक यांनी शिक्षकांना अध्ययन करण्याचा सल्ला दिला होता.

त्यानुसार पाठय़पुस्तकातील अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष ठिकाणी शिकविण्याचा विचार पुढे आला. या अनुषंगाने या चारही सरकारी प्राथमिक विद्यालयाचे शिक्षकवर्ग तेजा नाईक, सपना नाईक, गुरुदास शेटकर, उमा पार्सेकर, सिद्धी कामुलकर, पॅलेग्रीन फर्नांडिस, राजश्री वेंगुर्लेकर, चंद्रकात सर, श्वेता शेट कोरगावकर व बालवाडी शिक्षिका विनया गावडे यांच्या नेतृत्वाखाली 50 विद्यार्थ्यांना विविध स्थळांची सफर घडवून त्यांना तेथील कामकाजांचे प्रत्यक्ष शिक्षण देण्यात आले.

कोरगाव पंचायतीला भेट

या विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम कोरगाव पंचायत कार्यालयात भेट दिली. यावेळी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना पंचायत म्हणजे काय? त्याची रचना कशी असते. पंचायतीचा कारभार कसा चालतो? सरपंच व पंचायत सचिव यांचे कार्य, जबाबदारी आदी माहिती दिली. यावेळी माजी सरपंच उल्हास देसाई व सचिव महेश धारगळकर यांनी सर्वांचे स्वागत करून पंचायतबाबतची अधिक महिती दिली. त्यानंतर या विद्यार्थ्यांनी पंचायतीच्या वाचनालयालाही भेट देऊन वाचनालयाची माहिती मिळविली. भटवाडी येथील गणेशमूर्ती चित्रशाळेलाही विद्यार्थ्यांनी भेट देऊन चित्रशाळेत गणेशमूर्ती बनविण्याचे काम कसे चालते याचे प्रत्यक्ष दर्शन घेतले.

प्रगतशील शेतीची घेतली माहिती

प्रगतशील शेतकरी म्हणून प्रसिद्ध असलेले उदय प्रभूदेसाई यांच्या फार्म हाऊसलाही विद्यार्थ्यांनी भेट दिली. फार्म हाऊसमधील विविध प्रकारशी शेती, फूल व फळझाडे, गांडूळ खत प्रक्रिया व श्री पद्धतीने केलेली भातशेती याविषयी उदय प्रभूदसाई यांनी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष मार्गदर्शन केले. पाव हा गोमंतकीय खाद्यसंस्कृतीमधील महत्त्वाचा घटक मानला जातो. माध्यान्ह आहारातही विद्यार्थ्यांना पाव दिला जातो. हा पाव कसा तयार होतो याचे प्रत्यक्ष विधी पाहण्याची संधीही या विद्यार्थ्यांना मिळाली. कोरगाव येथील राजाराम शेटये यांच्या पावभट्टीवर भेट देऊन या विद्यार्थ्यांनी ही संपूर्ण माहिती मिळवली.

सुंदर व आदर्श शाळेला भेट

गोवा राज्यातील सुंदर व आदर्श शाळा म्हणून गौरविण्यात आलेल्या तुये येथील शाळेलाही या विद्यार्थ्यांनी भेट दिली. आदर्श विद्यालय होण्यासाठी या शाळेने राबविलेले विविध उपक्रम, तेथील अध्ययन पद्धती, शाळेची बाह्य व अंतर्गत स्वच्छता, रंगरंगोटी, सजावट, आवारात उभारण्यात आलेला स्वामी विवेकानंद यांचा पुतळा आदी अनेक गोष्टींचे विद्यार्थ्यांनी निरीक्षण केले. आपलीही शाळा अशीच आदर्श व सुंदर बनावी असा निर्धारही या विद्यार्थ्यांनी केला.

पत्रादेवी येथील हुतात्मा स्मारकारला भेट

पत्रादेवी येथे असलेल्या हुतात्मा स्मारकारलाही या विद्यर्थ्यांनी भेट देऊन स्वातंत्र्यसैनिकांच्या पराक्रमाची गाथा समजावून घेतली. गोवा मुक्तीसाठी ज्यांनी ज्यांनी आपल्या प्राणांची आहूती दिली त्यांचे सर्वांचे स्मरण यावेळी करण्यात आले. यानिमित्ताने विद्यार्थ्यांना गोवा मुक्ती संग्रामाचीही माहिती देण्यात आली. येथे उभारण्यात आलेले स्मारक व त्याचा इतिहासही मुलांना समजून सांगण्यात आला. अभ्यासक्रमाशी निगडीत असलेल्या या स्मारकाला भेट देऊन विद्यार्थी व शिक्षकांनी हुतात्म्यांना आदरांजली वाहिली. यावेळी गुरुदास शेटकर यांनी मुलांना मार्गदर्शन केले.

पालकांकडून अभिनय उपक्रमाचे कौतुक

शिक्षकांनी राबविलेल्या या अभिनय उपक्रमाचे कौतुक या चारही प्राथमिक सरकारी शाळांच्या पालकांनी केले आहे. भटवाडी पालक संघाचे अध्यक्ष परशुराम गणपुले, पालक राजू नर्से, पराष्टे पालक शिक्षक संघाच्या अध्यक्ष श्वेता डेगवेकर, विनोद चिंचकर, भालखाजनचे पालक प्रिया गावडे, तन्वी गावडे व देविदास गावडे यांनी सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले आहे.

Related posts: