|Friday, November 15, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » विचार आणि सवय

विचार आणि सवय 

कोणतीही गोष्ट जेव्हा आपण प्रथमच करतो, तेव्हा ती आपल्याला खूप अवघड वाटते आणि खूप लक्ष देऊन, विचारपूर्वक ती करावी लागते. ती करताना होणाऱया चुकांना सुधारत आपण ती गोष्ट पूर्ण करतो. दुसऱयांदा ती गोष्ट आपल्याला तेवढी अवघड वाटत नाही व अनेकवेळा केल्यानंतर त्या गोष्टीची आपल्याला सवय होते व ती सोपी वाटू लागते. याचा अर्थ कोणत्याही गोष्टीची पुनरावृत्ती केली, की त्या गोष्टीची आपल्याला सवय होते. त्यामुळेच कोणतीही गोष्ट शिकताना पुनरावृत्तीवर भर दिला जातो. शाळेत विद्यार्थ्यांकडून करून घेतलेली घोकंपट्टी, नाटकातील विविध प्रसंगांची केलेली रंगीत तालीम, कोणतीही कला आत्मसात करण्यासाठी केलेला सराव, या सर्व गोष्टींमागे सवयीचे हे तत्त्वच कार्य करत असते. प्रॅक्टिस मेक्स पर्फेक्ट (सरावाने पूर्णत्व येते) या म्हणीद्वारेदेखील सवयीचा हाच गुणधर्म सूचित केला गेलेला दिसतो. त्यामुळेच बालपणात चांगल्या सवयी लावण्यावर अधिक भर दिला जातो.

ज्याप्रमाणे आपण लक्ष देऊन जाणीवपूर्वक काही सवयी लावून घेत असतो, त्याचप्रमाणे काही सवयी अनवधानाने आपल्या नकळत आपल्या आत तयार होत असतात. परंतु त्यामागेदेखील पुनरावृत्तीचे हेच तत्त्व कार्य करत असते. आपल्या विविध लकबी, ठरावीक परिस्थितीत होणाऱया आपल्या ठरावीक प्रतिक्रिया ही अशा प्रकारच्या सवयीची काही उदाहरणे आहेत. जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट आवडते, तेव्हा ती आपल्याला पुनः पुन्हा करावीशी वाटते. परंतु त्या गोष्टीची पुनरावृत्ती केल्याने आपल्याला तिची सवय होते व तिच्यात रस वाटेनासा होतो. सवयीचे अंतिम टोक म्हणजे व्यसन. पहिल्यांदा कुतूहल म्हणून किंवा मित्रांच्या आग्रहाखातर अथवा सामाजिक परिस्थितीच्या दबावाखाली एखादा माणूस एखादे कृत्य करतो अथवा एखाद्या गोष्टीचे सेवन करतो-उदाहरणार्थ मद्यपान. त्यातून निर्माण होणारी संवेदना आणि नशा यामुळे त्याला पुनः पुन्हा मद्य घ्यावेसे वाटते. थोडय़ाच काळात त्याला मद्याची चटक लागते आणि कालांतराने अशी परिस्थिती निर्माण होते, की त्याने जर मद्यपान केले नाही तर त्याला त्याची उणीव भासू लागते व त्रास होऊ लागतो. सुरुवातीला सुखसंवेदनेसाठी मद्य घेणारा आता ते न घेतल्यास होणारा त्रास टाळण्यासाठी मद्य घेऊ लागतो, असे झाले म्हणजे सवयीचे व्यसनात रूपांतर होते. चहा कॉफी, धूम्रपान, अमली पदार्थ इत्यादींची व्यसनेदेखील अशाप्रकारे तयार होतात.

सवयीचे हे तत्त्व केवळ शारीरिक पातळीवरच नव्हे, तर मानसशास्त्रीय पातळीवरदेखील कार्यरत असते. ठरावीक पद्धतीने विचार करण्याची सवय झाली, म्हणजे वेगळय़ा पद्धतीने विचार करणे अवघड जाते. सुरुवातीला जरी तो विचार अयोग्य वाटला, तरी जसजशी त्याची सवय होते, तसतसा तो योग्यदेखील वाटू लागतो. मानवी समाजातील अनेक मतप्रवाह, रूढी व परंपरा हा सवयीचाच परिणाम आहे. दिलेल्या परिस्थितीत ठरावीक भावनिक प्रतिसाद देण्याची सवय झाली म्हणजे, तोच प्रतिसाद योग्य व अपरिहार्य वाटू लागतो. एखाद्या व्यक्तीला जेव्हा एखाद्या गोष्टीचा राग येतो, तेव्हा त्या गोष्टीला रागाने प्रतिसाद देण्याची त्याला सवय झालेली असते व ते त्याला स्वाभाविकदेखील वाटत असते व तो त्याचे समर्थनही करत असतो. सवयीमुळे माणसाची संवेदनक्षमता कमी होऊन त्याच्यात एक प्रकारचा बोथटपणा येतो. त्याच्यातील उत्कटता कमी होते. माणसाला दु:खाची सवय झाली म्हणजे त्याच्या वेदनेची तीक्ष्णता कमी होते व कालांतराने त्याला त्याचे काहीच वाटेनासे होते. त्यामुळेच दु:खावरचा काळ हादेखील एक इलाज समजला जातो. कोणत्याही सवयीच्या मागे काळ हा निहितच असतो. तसेच पुनरावृत्तीच्या मुळाशी स्मृती असते. स्मृतीशिवाय पुनरावत्ती शक्मय नाही. सवयीचे हे तत्त्व काही बाबतीत आवश्यक व उपयुक्त असले तरी मानवी नातेसंबंधाच्या क्षेत्रात त्यामुळे अनेक समस्या निर्माण होताना दिसतात. माणसाला घराची व वस्तूंची सवय झाली म्हणजे त्याला त्यांचा कंटाळा येऊ लागतो. मग तो घरातील व्यवस्था बदलून त्यातल्या त्यात काहीतरी नावीन्य आणण्याचा प्रयत्न करतो. कंटाळा आलेल्या वस्तू बदलून तो नव्या वस्तू विकत घेतो. परंतु माणसाला जेव्हा दुसऱया माणसाची सवय होते तेव्हा त्यातून दुसऱया माणसासंबंधी त्याच्या मनात विविध प्रकारच्या अपेक्षा व त्यातून अपेक्षाभंगाच्या दु:खाची संभावना निर्माण होते. एकमेकांची सवय झालेल्या पतीपत्नींच्या संबंधातील नावीन्य संपलेले असते. एकमेकांच्या वागण्यातील तोच तोपणा त्यांना कंटाळवाणा वाटू लागलेला असतो. त्यांच्यातील जिव्हाळा संपून त्याची जागा नीरसतेने घेतलेली असते. केवळ परिस्थितीची निकड म्हणून ते एकत्र राहत असतात. पण संधी मिळताच ते वेगळे होतात किंवा अन्य गोष्टींमधून व्यक्तिगत व्यासंग, करमणूक शोधू लागतात. त्यांच्यातील नाते संपुष्टात आलेले असते.

सवयीच्या मुळाशी विचार, काळ व पुनरावृत्ती हे घटक दिसून येतात. कोणत्याही घटनेतून तयार झालेला मानसशास्त्रीय अवशेष स्मृतीच्या रूपाने आपल्या मेंदूत साठवला जातो. या स्मृतीतूनच विचार व काळ उद्भवतात आणि त्यांच्या आधारे त्या घटनेच्या अनुभवाची पुनरावृत्ती होते व सवय निर्माण होते. वैचारिक पातळीवर एकदाच केलेली गोष्टही वैचारिक सवय निर्माण करण्यास पुरेशी असते व त्यानंतरच्या पुनरावृत्तीतून ती दृढ होत जाते. त्यामुळे एकदा मनात आलेला विचारच पुनः पुन्हा मनात येण्याची शक्मयता जास्त असते. विचार बदलून फार फार तर एका सवयीच्या जागी दुसरी सवय आणता येऊ शकते परंतु त्यातून सवयीच्या प्रवृत्तीचा अंत होऊ शकत नाही. त्यासाठी सवयच निर्माण होणार नाही अशी परिस्थिती तयार होणे आवश्यक आहे. कोणत्याही घटनेच्या अवशेषातून स्मृती व त्या स्मृतीतून त्या घटनेच्या अनुभवाची पुनरावृत्ती व त्या पुनरावृत्तीतून तयार होणारी सवय हा क्रम मोडून काढणे शक्मय आहे का? याचाच अर्थ  कोणतीही घटना कोणताही मानसशास्त्रीय अवशेष मागे न ठेवता जगता येणे शक्मय आहे का? हे तेव्हाच शक्मय आहे जेव्हा ती घटना पूर्णत्वाने जगण्यात येईल.

कोणतीही गोष्ट पूर्णत्वाने जगण्यासाठी अवधानाची आवश्यकता असते. अवधान हे फक्त वैचारिक पातळीवर नसते तर त्यात मनुष्याचे संपूर्ण अस्तित्व सम्मीलित असते. मनुष्याची विचारयंत्रणा, भावावेग, संवेदनक्षमता, शारीरिक क्रिया या सर्व एकसंधपणे त्यात समाविष्ट असतात, त्यांच्यात कोणतेही विभाजन नसते, कारण विभाजन करणारे केंद्र म्हणजेच स्व, अहं किंवा इगो तेथे नसतो. अवधानी मन जीवनातील प्रत्येक प्रसंग नव्याने जगते, पुनरावृत्तीच्या स्वरूपात नव्हे, तर सर्जनशीलतेने. म्हणूनच तेथे कोणत्याही अनुभवाचे सवयीत रूपांतर होत नाही. असे अवधानी मनच खऱया अर्थाने मुक्त असते.

किशोर खैरनार,

 

Related posts: