|Wednesday, January 29, 2020
You are here: Home » राष्ट्रीय » हैदराबाद बॉम्बस्फोट : दोन जणांना मृत्युदंड

हैदराबाद बॉम्बस्फोट : दोन जणांना मृत्युदंड 

तिसऱया दोषीला जन्मठेप : 11 वर्षांपूर्वी स्फोट,  42 जणांचा मृत्यू

वृत्तसंस्था/ हैदराबाद

11 वर्षांपूर्वी हैदराबादमध्ये झालेल्या दुहेरी बॉम्बस्फोटांप्रकरणी एनआयएच्या विशेष न्यायालयाने दोन दोषींना मृत्युदंड तर एका गुन्हेगाराला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. अनीक शफीक सईद आणि इस्माइल चौधरी यांना मृत्युदंड तर तारिक अंजुमला जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली.

अनीक शफीक सय्यद आणि अकबर इस्माइल चौधरी हे या स्फोटात थेट सहभागी असल्याने  त्यांना मृत्यूदंड ठोठावण्यात आला. न्यायालयाने मागील आठवडय़ात त्यांना दोषी ठरविले होते. अनीकवर लुबिंनी पार्कमध्ये बॉम्ब ठेवल्याचा आरोप आहे. या बॉम्बच्या स्फोटात 10 जणांचा मृत्यू झाला होता. तर अकबरने दिलसुखनगर येथे ठेवलेल्या बॉम्बचा स्फोट झाला नव्हता. ऑक्टोबर 2008 मध्ये महाराष्ट्र एटीएसने त्यांना अटक केली होती.

न्यायालयाने इंडियन मुजाहिदीनचा दहशतवादी तारिक अंजुमला सोमवारी दोषी ठरविले आहे. तारिकने स्फोट घडवून आणणऱया दहशतवाद्यांना आश्रय दिला होता. 2007 मध्ये झालेल्या या बॉम्बस्फोटांमध्ये 42 जणांचा मृत्यू झाला होता. तर 50 हून अधिक जण जखमी झाले होते.

तर अन्य दोन आरोपी फारुख शरफुद्दीन आणि सादिक अहमद शेख यांना पुराव्यांअभावी निर्दोष ठरविण्यात आले आहे. पाचव्या आरोपीबद्दल पुढील आठवडय़ात निकाल दिला जाईल. अन्य दोन आरोपी रियाज भटकळ आणि इक्बाल भटकळ अद्याप फरार आहेत.

25 ऑगस्ट 2007 रोजी हैदराबादमध्ये विविध ठिकाणी बॉम्बस्फोट झाले होते. या स्फोटांमुळे हैदराबाद समवेत देशभरात खळबळ उडाली होती. या स्फोटांमागे इंडियन मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेचा हात होता. न्यायालयाच्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याची माहिती दोषींच्या वकिलाने दिली आहे.

Related posts: