|Tuesday, January 28, 2020
You are here: Home » आवृत्ती » सातारा » वडगावात हुतात्मा दिनाला गटबाजीचे ग्रहण

वडगावात हुतात्मा दिनाला गटबाजीचे ग्रहण 

वार्ताहर/ औंध

देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी गटतट, मतभेद बाजूला ठेवून एकदिलाने हुतात्म्यांनी आपले बलिदान देऊन देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले.  मात्र अलीकडे वडगांव जयराम स्वामी (ता. खटाव) येथे हुतात्म्यांना अभिवादन कार्यक्रमाला गटबाजीचे ग्रहण लागले असून ही मतभेदाची दरी मिटणार तरी कधी? असा सवाल उपस्थितांनी व्यक्त केला आहे.

देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी 9 सप्टेंबर 1942 साली चलेजाव आंदोलनात खटाव तहसील कार्यालयावर वडगांवचे सुपूत्र हुतात्मा परशुराम घार्गे यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील लोकांनी मोर्चा काढला होता. या मोर्चावर जुलमी इंग्रज अधिकाऱयांनी केलेल्या बेछूट गोळीबारात खटाव तालुक्यातील हुतात्मा बलभीम हरी खटावकर, बाळकृष्ण खटावकर, (पुसेसावळी) परशुराम घार्गे, आनंदा गायकवाड, सिधू पवार, किसन भोसले, खाशाबा शिंदे, रामचंद्र सुतार   (वडगांव), श्रीरंग शिंदे (उंचिठाणे) या नऊ जणांना आपले प्राण गमवावे लागले होते.  या हुतात्म्यांचा बलिदानाचा  इतिहास तरुणपिढी समोर कायम रहावा, यासाठी शासनाने हुतात्म्यांचा स्मरणार्थ त्यांच्या गावात हुतात्मा स्मारके उभी केली आहेत. दरवर्षी 9 सप्टेंबर रोजी वडगांव जयराम स्वामी येथे ग्रामस्थ हुतात्मा दिनाचा कार्यक्रम आयोजित करतात.

गटतट बाजूला ठेवून गेली अनेक वर्षे हा कार्यक्रम पार पडत आहे.

परंतु अलीकडे गावातील वाढलेले पक्षीय राजकारण आणि गटातटाच्या चौकटीत वाढलेली मतभेदाची दरी यामुळे हुतात्मा दिन वेगवेगळा साजरा करण्यात येत आहे. हुतात्म्यांना अभिवादन करण्यापेक्षा आपल्या गटातील नेत्यांची खुशामतगिरी करण्यात हे वारसदार धन्यता मानत आहेत. कालच्या कार्यक्रमात ही मतभेदाची दरी अधिक गडद झाल्याचे चित्र दिसून आले. याबद्दल हुतात्म्यांना कोणताही पक्ष नव्हता. त्यामुळे त्यांना पक्षीय चौकटीत अडकवून या कार्यक्रमाची उंची कमी होत असल्याबद्दल अनेक नेत्यांनी खंत व्यक्त केली. तसेच गटतट बाजूला ठेवून हुतात्मा दिनाचा कार्यक्रम एकत्र साजरा करण्याचे आवाहन केले.

गटबाजीच्या कार्यक्रमात प्रशासनाची कसरत

काल  हुतात्मा क्रान्ती प्रतिष्ठान, आणि खाशाबा शिंदे सांस्कृतिक प्रतिष्ठान यांनी वडगांव येथे हुतात्म्यांना अभिवादन करताना वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले होते. त्यामुळे हुतात्मादिनातील गटबाजी अधोरेखित झाली होती. याबद्दल नेत्यांनी खंत व्यक्त केली. पण दोन्ही गटातील कार्यक्रम पार पाडताना शालेय विद्यार्थी आणि प्रशासनाची कसरत झाली.

Related posts: