|Monday, September 23, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » आपल्याच नशिबात

आपल्याच नशिबात 

हे असं आपल्याच नशिबात का आलं? हा प्रश्न आपल्याला अनेकदा पडतो. मनासारखी गोष्ट घडली नाही की आपल्या तोंडून हमखास हे वाक्मय किंवा या आशयाचं वाक्मय बाहेर पडतं.

कुठेतरी लांब जायला म्हणून आपण निघतो आणि चार पैसे वाचवता आले तर पहावेत या हिशेबाने बसच्या रांगेत उभे राहतो. बराच वेळ बस येत नाही. शेवटी कंटाळून आपण रिक्षात बसतो. रिक्षा चालू होते नि तेवढय़ात पाठीमागून आपल्याला हवी असलेली बस आलेली दिसते. कॉलेजमध्ये असताना घराजवळच एक सुंदर मुलगी रहायची. ती दिसेल किंवा आपल्याला पाहील या भीतीमुळे मी सक्काळी सक्काळी दूध आणायला जाताना देखील व्यवस्थित कपडे परिधान करून जायचो. पण नेमकं ज्या दिवशी लुंगी आणि मळलेला टी शर्ट घालून बाहेर पडायचो त्याच दिवशी ती दर्शन द्यायची. मग आपला गबाळा अवतार तिला दिसू नये म्हणून तोंड चुकवायचो. अशा त्या योगायोगाच्या गमती. पूर्वी रेल्वेचं आरक्षित तिकीट काढायला रांगेत उभं रहावं लागे. आपला नंबर जवळ आला की बुकिंग क्लार्क जेवायला जाणे अशी गंमत हमखास होई. शिकवणीच्या एकाच सरांनी महत्त्वाचे म्हणून दिलेले प्रश्न ज्या दिवशी घोकून जावेत त्या दिवशी वेगळे प्रश्न यावेत आणि आणि ज्या दिवशी सरांनी दिलेल्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करावं तेच प्रश्न पेपरात यावेत हा अनुभव तर अनेकदा आला.

तर हे सगळं आपल्याच नशिबात नसून फिरंग्यांच्या नशिबात देखील होतं हा परवा शोध लागला. साहेब देखील आपल्याप्रमाणे अडचणीत येतो हे पाहून आनंद झाला. पूर्वी सिनेमाच्या तिकीटाच्या रांगेत उभं राहून आपला नंबर आल्यावर तिकीटे संपली की होणारे दु:ख रांगेत आपल्यामागे असलेल्या लोकांकडे पाहून कसे हलके होते, तसाच हा आनंद होता. साहेबाच्या यादीतली काही उदाहरणं-काम करताना दोन्ही हातांना वंगण लागलेलं असतं तेव्हाच नाकाला खाज येते. समारंभात ज्यांच्यासाठी पुढील खुर्च्या राखून ठेवलेल्या असतात तेच नेमके उशिरा येतात. पैसे काढण्यासाठी दोन रांगा असतील आणि शेजारची रांग वेगाने पुढे जाते म्हणून आपण त्या रांगेत गेलो की आपली आधीची रांग वेगाने पुढे जाऊ लागते.

ङ ङ ङ