|Friday, November 15, 2019
You are here: Home » क्रिडा » सिंधू, श्रीकांत उपांत्यपूर्व फेरीत

सिंधू, श्रीकांत उपांत्यपूर्व फेरीत 

वृत्तसंस्था /चांगझू (चीन) :

भारताच्या पीव्ही सिंधू व किदाम्बी श्रीकांत यांनी चीन ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. सिंधू व श्रीकांतला या विजयासाठी मात्र बराच संघर्ष करावा लागला. तसेच, मिश्र दुहेरीत मात्र प्रणव चोप्रा व एन सिक्की जोडीचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले.

गुरुवारी झालेल्या लढतीत सिंधूने जागतिक क्रमवारीत 24 व्या स्थानावर असलेल्या थायलंडच्या बुसानन ओंगबॅमरुंगफानला 21-23, 21-13, 21-18 असे पराभूत केले. 69 मिनिटे चाललेल्या या लढतीत बुसानने रिओ ऑलिम्पिक रौप्यजेत्या सिंधूला चांगलीच टक्कर दिली. पहिल्या गेमपासून दोन्ही खेळाडूंत चुरशीचा खेळ पहायला मिळाला. पहिल्या गेममध्ये बुसानने आक्रमक खेळ करत 23-21 असा हा गेम जिंकत 1-0 अशी आघाडी मिळवली. दुसऱया गेममध्ये मात्र सिंधूने जोरदार पुनरागमन करताना 13-8 अशी आघाडी घेतली होती. ही आघाडी कायम ठेवत सिंधूने दुसरा गेम 21-13 असा जिंकला व 1-1 अशी बरोबरी साधली.

यानंतर, तिसऱया व निर्णायक गेममध्ये देखील दोन्ही खेळाडूंत एकेका गुणासाठी चुरस पहायला मिळाली. सिंधूने 15-10 अशी आघाडी घेतली होती. मात्र, थायलंडच्या या खेळाडूने संघर्ष करत हा गेम 18-18 असा बरोबरीत आणला. यानंतर, सिंधूने सलग तीन गुणाची कमाई करत हा गेम 21-18 असा जिंकला व पुढील फेरीत प्रवेश केला. सिंधूची पुढील लढत कोरियाच्या सुंग जी हय़ुन व चीनच्या चेन युफेई यांच्यातील विजेत्यांशी होईल.

के.श्रीकांतची विजयी आगेकूच कायम

बुधवारी या स्पर्धेतील पुरुषांच्या एकेरीतील लढतीत भारताच्या किदाम्बी श्रीकांतला देखील विजयासाठी चांगलाच संघर्ष करावा लागला. अर्थात, बऱयाच संघर्षानंतर श्रीकांतने थायलंडच्या सुपान्याहूविरुद्ध 21-12, 15-21, 24-22 असा विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरी गाठली. पहिला गेम श्रीकांतने जिंकल्यानंतर दुसऱया गेममध्ये थायलंडच्या या खेळाडूने पुनरागमन करत 1-1 अशी बरोबरी साधली. तिसऱया व निर्णायक गेममध्ये देखील दोन्ही खेळाडूंत एकेका गुणासाठी चांगला संघर्ष पहायला मिळाला. एकवेळ दोन्ही खेळाडूंत 22-22 अशी बरोबरी होती मात्र श्रीकांतने नेटजवळ सरस खेळ करत सलग दोन गुणाची कमाई केली व हा गेम 24-22 असा जिंकत पुढील फेरीत प्रवेश केला आहे. आता, उपांत्यपूर्व फेरीत श्रीकांतसमोर जपानच्या केंटा मोमोटाशी होईल.

याशिवाय, मिश्र दुहेरी प्रकारात भारताच्या प्रणव चोप्रा-एन सिक्की रेड्डी जोडीला दुसऱया फेरीच्या लढतीतच पराभव स्वीकारावा लागला. भारतीय जोडीला डेन्मार्कच्या माथियास-ख्रिस्टिना जोडीने 21-16, 21-10 असे नमवत स्पर्धेबाहेरचा रस्ता दाखवला. 

Related posts: