|Monday, September 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » आज राज्य साधनसुविधा महामंडळाच्या अधिकाऱयांची बैठक

आज राज्य साधनसुविधा महामंडळाच्या अधिकाऱयांची बैठक 

प्रतिनिधी /डिचोली :

येथील बसस्थानकावर घडलेल्या दुर्घटनेनंतर बसस्थानकाच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. 1996 साली उभारण्यात आलेली सदर इमारत आता कमकुवत बनत चालली असून धोकादायक बनली आहे. त्याचा प्रत्यय बुधवार 19 रोजी आला. त्यामुळे आता नियोजित नवीन बसस्थानकाच्या कामाबाबत डिचोलीत चर्चा होऊ लागली आहे. यासंबंधी आज 21 रोजी गोवा राज्य साधनसुविधा विकास महामंडळाच्या अधिकाऱयांशी बैठक असल्याची माहिती आमदार राजेश पाटणेकर यांनी बोलताना दिली.

बुधवारी संध्याकाळी येथील बसस्थानकाच्या छप्पराचा तुकडा रेखा देवी या मूळ बिहार येथील व सध्या मये येथील महिलेच्या पायावर पडला. यात ती गंभीर जखमी झाली. तिला प्रथम डिचोली आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करून म्हापसा येथे हलविण्यात आले. अधिक उपचारासाठी तिला बांबोळी येथे पाठविण्यात आले आहे.

सध्या छप्पराचा भाग कोसळत असलेली जागा दोरखंड बांधून ठेवण्यात आली आहे. तसेच धोकादायकचे फलकही लावण्यात आले आहेत.

इमारतीचे स्वास्थ्य बरोबर नसल्याचा अहवाल

गेल्या सहा वर्षापूर्वी गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयातर्फे डिचोली बसस्थानकच्या इमारतीची चाचणी करण्यात आली होती. याबाबत ‘स्टेबिलीटी रिपोर्ट करण्यात आला होता. त्या अहवात सदर इमारतीची परिस्थिमी योग्य नसून ती धोकादायक बनली आहे. ती लवकरात लवकर पाडण्यात यावी, असे सुचित करण्यात आले आहे.

साधन सुविधा महामंडळाबरोबर बैठक घेणार

डिचोली नवी बसस्थानकाच्या प्रकल्पाचे काम कुठपर्यंत पोहचले आहे. याचा अंदाज घेण्यासाठी आज 21 रोजी गोवा राज्य साधन सुविधा महामंडळाच्या अधिकाऱयांसमवेत बैठक घेण्यात येणार आहे, असे पाटणेकर यांनी सांगितले.