|Saturday, October 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » राजा निलगारला भावपूर्ण वातावरणात निरोप

राजा निलगारला भावपूर्ण वातावरणात निरोप 

प्रतिनिधी/   संकेश्वर

गेल्या 19 दिवसांत ‘राजा निलगार’च्या दर्शनासाठी येणारा भाविकांचा लोंढा लक्षवेधी होता. सोमवारी शेवटच्या दिवशी दिवसभर भाविकांनी दर्शन घेतले. रात्री 11.30 वाजता हेद्दूरशेट्टी परिवारासह दर्शनासाठी आलेल्या हजारो भाविकांनी विधीवत पूजा, आरती केली व रात्री 12 वाजता श्रीमूर्ती विसर्जन मिरवणुकीस प्रारंभ झाला. ‘बाप्पा मो।़।़।़रया पुढच्या वर्षी लवकर या।़।़।़, अशी हाक देत हिरण्यकेशीत मध्यरात्री ‘राजा निलगार’चे श्रद्धेने व भक्तीमय वातावरणात विसर्जन करण्यात आले.

कर्नाटक, महाराष्ट्र व गोव्यातील कानाकोपऱयातून भाविकांनी ‘राजा निलगार’च्या दर्शनासाठी हजेरी लावली होती. रविवारी भाविकांनी प्रचंड गर्दी केल्याने काही भाविकांना दर्शन मिळाले नाही. त्यामुळे बाहेरुनच दर्शन घेत निराश होऊन भाविक परतत होते. रात्री उशिरापर्यंत दर्शन सुरू होते. मध्यरात्री भजनाचा कार्यक्रमही पार पाडला. भाविक मिळेल त्या वाहनांनी संकेश्वर गाठत होते. 19 दिवसाच्या काळात शहराला जत्रेचे स्वरुप प्राप्त झाले होते. तर शहरातील प्रत्येक मार्ग माणसांनी फुलून गेला होता.

व्यवसायातून व्यापाऱयांची चांदी

यंदा ‘राजा निलगार’चे वास्तव्य 19 दिवसाचे होते. त्यामुळे भाविकांनी प्रतिष्ठापनेच्या पहिल्या दिवसापासून दर्शनासाठी गर्दी केली होती. गांधी चौक, हेद्दूरशेट्टी गल्ली, नवी गल्ली, लक्ष्मी ओढा व पूलाच्या ठिकाणी पेढय़ांची, खेळणी, मिठाई, कापूर, नारळ आदी स्टॉलची मोठी गर्दी झाली होती. तसेच शहरातील हॉटेल, खानावळी भाविकांच्या गर्दींनी फुलून गेले होते. बस, वडाप व रिक्षांना भाविकांची मोठी गर्दी दिसत होती. त्यामुळे रिक्षा स्टँडवर रिक्षा मिळणे कठीण झाले होते. यंदा सुमारे 5 लाख भाविकांनी दर्शन घेतले. गतवर्षापेक्षा यंदा 50 हजारांनी भाविकांची संख्या वाढल्याचे बोलले जात होते. 19 दिवसात कोटय़वधी रुपयांची उलाढाल झाल्याची चर्चा व्यापारी वर्गात आहे.

पालिकेचे नियोजन ढासळले

रविवारी 50 हजार भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. भाविकांची वाढती संख्या लक्षात घेऊन महाप्रसाद आटोपता घेण्यात आल्याची चर्चा पुढे आली आहे. यंदा पालिकेने स्वच्छता उपाययोजनेच्या दृष्टीने म्हणावे तसे नटके नियोजन केले नाही. भाविकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन शहरातील काही धनवातानी सोयीचे तंत्र स्वत: अवलंबला होते. दर्शनासाठी भाविकांची वाढती संख्या लक्षात घेऊन किमान पुढच्या वर्षी तरी नेटके नियोजन पालिकेने पुढाकार घेऊन करावे, अशी मागणी भाविकांतून पुढे आली आहे.

सोमवारी रात्री उशिरा राजा निलगारला निरोप देत पुढच्या वर्षाचे आमंत्रणही देण्यात आले. चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आल्यामुळे शांततापूर्ण व श्रद्धेने भक्तीमय वातावरणात विसर्जन झाले.

सिटीजन फोरमचे काम कौतुकास्पद

 19 दिवसाच्याकाळात प्रदूषणविरहीत गणशोत्सव साजरा करण्यासाठी येथील सिटीजन फोरमच्या कार्यकर्त्यांनी कंबर कसली होती. बाजारपेठेत येणाऱया पेढय़ावर करडी नजर ठेवून भेसळ असणार नाही याची खबरदारी घेतली जात होती. तसेच फटाक्यांची आतषबाजी होऊ नये यासाठी बाहेरुन येणाऱया प्रत्येक भाविकांना गाठून फटाक्याची आतषबाजी करू नका अशा विनंतीवजा सूचना करीत होते. सर्वच ठिकाणी आपल्या कार्यकर्त्यांचे जाळे पेरुन उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी विशेष प्रयत्न केले होते. या दररोजच्या कार्याबद्दल नागरिकांतून कौतुक व्यक्त केले जात होते.