|Monday, February 24, 2020
You are here: Home » विशेष वृत्त » दुचाकींची अनोखी दुनिया

दुचाकींची अनोखी दुनिया 

अस्मिता मोहिते / पुणे :

दुचाकीप्रेमीकडून 450 दुचाकींचा संग्रह, महाबळेश्वरमध्ये साकारणार दुचाकींचे संग्रहालय

 

जगामध्ये विविध प्रकारचे छंद जोपासणाऱया व्यक्तींबद्दल आपण नेहमी ऐकत असतो. पुण्यामधील विनीत केंजळे यांनीही विविध प्रकारच्या दुचाकी जमा करण्याचा छंद जोपासला असून, आत्तापर्यंत त्यांनी जवळपास 450 दुचाकींचा संग्रह केला आहे. त्यांच्या या छंदाची जागतिक पातळीवर नोंद झाली आहे. 2018 च्या ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्डस्’कडून या त्यांच्या उपक्रमाची दखल घेण्यात आली असून, लवकरच या संग्रहाचे महाबळेश्वरमध्ये संग्रहालयात रुपांतर होणार आहे.

1987 पासून त्यांनी हा छंद जोपासण्यास सुरूवात केली. या त्यांच्या छंदाला त्यांच्या घरच्या मंडळींनी व मित्र वर्गानेदेखील तितकेच सहकार्य केले. विनीत यांना लहानपणापासूनच दुचाकी गाडय़ांचे एक वेगळेच आकर्षण होते. ज्यावेळी ते 10 मध्ये शिक्षण घेत होते, त्यावेळी त्यांनी पुण्यामध्ये लॅमरेटा-डी ही दुचाकी पाहिली, व त्या गाडीबद्दल एक वेगळेच आकर्षण निर्माण झाले आणि आपणदेखील विविध प्रकारच्या दुचाकी जमविण्याची उत्सुकता निर्माण झाली. त्यातूनच त्यांच्याकडे विविध प्रकारच्या दुचाकींचा संग्रह जमा होत गेला. महाराष्ट्रासह देशातील विविध राज्यातून हा संग्रह त्यांनी जमा केला. यामध्ये पंजाबमधून लॅमरेटा राजदूत स्कूटर, अमृतसर (पाकिस्तान बॉर्डर) येथून बजाज स्पोर्टस् मॉडेल, तसेच कोल्हापूर येथील घाटगे पाटील यांच्याकडून मोपेड, तसेच उत्तर प्रदेश, गुजरात, राजस्थान, कर्नाटक, आदी ठिकाणाहून गाडय़ा जमा केल्या आहेत. सध्या या संग्रहालयातील काही निवडक दुचाकी पाहण्यास मिळाव्यात, याकरिता 7 ऑक्टोबरपर्यंत सकाळी 10 ते रात्री 9 बिबेवाडी (कोंढवा रोड) लाईट हाऊस येथे ठेवण्यात आल्या आहेत. त्याला नागरिकांचा उत्तम प्रतिसाददेखील लाभत आहे.

विविध प्रकारच्या गाडय़ा

आजपर्यंत त्यांनी जमा केलेल्या या त्यांच्या संग्रहालयात वैशिष्टपूर्ण व वैविध्यपूर्ण दुर्मीळ दुचाकींचा समावेश आहे. 1940 मधील मॅचलेस या ब्रिटिश दुचाकीपासून सध्यापर्यंतच्या दुचाकींचा समावेश आहे. त्यामध्ये 1950 मधील रॉयल एन्फील्ड कंपनीची स्कूटर, पियाजीओ कंपनीची व्हेस्पा, बजाज कंपनीच्या स्कूटर, रॉयल एन्फील्डची फॅन्टाव्यूलस, स्कूटर इंडियाची विजय सुपर, ऑल्वीन पुष्पक, कॅल्वीनेटरची स्कूटर, गुजरात स्कूटरची नर्मदा, गिरनार अशा सर्व प्रकारच्या स्कूटर, मोपेड व मोटर सायकल आहेत.

सर्व गाडय़ा चालू स्थितीत

जगामध्ये विविध ठिकाणी दुर्मिळ गाडय़ांचे प्रदर्शन भरविले जाते, यामध्ये विशेष अशा दुचाकींच्या गाडय़ांचा हा संग्रह आशिया खंडात विनीत यांच्याकडेच आहे. मुख्य म्हणजे त्या चालू स्थितीत आहेत.

लवकरच महाबळेश्वरमध्ये संग्रहालय

सर्वांना या गाडय़ा पहावयास मिळाव्यात, याकरिता येत्या डिसेंबर महिन्यापासून संग्रहाचे रूपांतर संग्रहालयात करण्यात येणार आहे. हे म्युझियम महाबळेश्वर येथे होणार आहे. तसेच या दुचाकी इच्छुकांना हाताळण्याकरिता अर्धा किमीचा ट्रकदेखील बनविण्यात येणार आहे, असे विनीत केंजळे यांनी सांगितले. जुन्या गाडय़ा मोडीत काढण्याऐवजी, त्या आमच्याकडे द्या. त्याची योग्य ती किंमत देऊ, या आवाहनानुसार बऱयाच गाडय़ा संग्रहात जमा होत गेल्या. तसेच काही नागरिकांनी हा छंद बघून स्वतःहून आपल्याकडील दुर्मीळ अशा गाडय़ा भेट स्वरूपात दिल्या, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

 

 

 

 

 

 

 

Related posts: