|Saturday, February 22, 2020
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » लोकसहभागातून गाळ काढण्याचे काम आदर्शवत!

लोकसहभागातून गाळ काढण्याचे काम आदर्शवत! 

जिल्हाधिकारी पांढरपट्टे यांचे तिवरेत जलपूजन कार्यक्रमात कौतूकोद्गार

प्रतिनिधी / कणकवली:

राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारताचे माजी पंतप्रधान स्वर्गीय लाल बहादूर शास्त्राr यांनी भारतात चैतन्य निर्माण केलं. खेडी स्वयंपूर्ण व्हावीत, असं महात्मा गांधी यांचं स्वप्न होतं. या दिग्गज नेत्यांच्या जयंतीदिनी तिवरे गावात गाळमुक्त तलाव व गाळयुक्त शिवार अंतर्गत तिवरे तलावाचं जलपूजन होत आहे, याचा आनंद होत आहे. तिवरे ग्रामस्थांनी लोकसहभागातून तलावातील गाळ काढण्याचं काम पूर्ण केलं. तिवरे ग्रामस्थांची एकजूट हा आदर्श सर्वांसमोर आहे, असे गौरवोद्गार जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी काढले.

तिवरे तलाव येथे अनुगामी लोकराज्य अभियान व तिवरे ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने जलपूजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावेळी डॉ. पांढरपट्टे बोलत होते. या समारंभास अनुलोमचे मुख्य कार्यकारी अधिकारी अतुल वझे, निवासी उपजिल्हाधिकारी विजय जोशी, जिल्हा माहिती अधिकारी मिलिंद बांदिवडेकर, गटविकास अधिकारी मनोज भोसले, तिवरे सरपंच सौ. लतिका म्हाडेश्वर, उपसरपंच रवींद्र आंबेलकर, ग्रामसेविका श्रीमती वराडकर, शाखा अभियंता एम. व्ही हवालदार, बालविकास अधिकारी प्रणयकुमार चैटलावार आदी उपस्थित होते.

पांढरपट्टे म्हणाले, जलयुक्त शिवार ही शासनाची क्रांतिकारी योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्यात अनेक गावं शेतीसाठीच्या पाण्याबाबत स्वयंपूर्ण झाली आहेत. जलयुक्त शिवार योजनेमुळे लोकसहभागातून अनेक शिवारं पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झालीत. राज्यभरात ही लोकांची चळवळ उभारली गेली. तिवरे तलावाच्या माध्यमातून उपलब्ध पाण्याचा येथील शेतकऱयांनी पुरेपूर वापर करावा व दुबार पीक पद्धतीबरोबरच आपल्या फळबागांचा विकास करावा.

निवासी उपजिल्हाधिकारी विजय जोशी म्हणाले, सिंधुदुर्गात थोडा उशिराच गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार हा कार्यक्रम गतवर्षी राबविण्यात आला. पावसाळा सुरू झाला. त्यामुळे जिल्हय़ातील वाफोली, विलवडे, तिवरे, पावशी या चारच ठिकाणी गाळ काढण्याची कामे झाली. तथापी, यंदा किमान 40 ठिकाणी अशी गाळ काढण्याची कामे करण्याचा संकल्प केला आहे.

अनुलोमचे अतुल वझे यांनी प्रास्ताविकात राज्यभरातील अभियानाचा आढावा घेतला. गेल्या अडिच वर्षात अनुलोममार्फत ऍपच्या माध्यमातून शासनाच्या 125 योजनांची माहिती चार लाख लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात आली आहे. 70 वैयक्तिक लाभाच्या योजनांची माहिती 9 लाख 40 हजार लोकांनी डाऊनलोड करून घेतली आहे. गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार अभियानाखाली अनुलोम व ग्रामस्थांच्या सहकार्याने 1360 तलावातील 1 कोटी 20 लक्ष घनमीटर गाळ काढण्यात आला आहे. अनुलोमचे जीतेंद्र चिकोडी, महेंद्र दळवी, अमित नाईक, सदाशिव चव्हाण, मंडळ अधिकारी दिलीप पाटील, तलाठी आर. व्ही. मसुरकर तसेच तिवरेचे ग्रामस्थ मोठय़ा संख्यने उपस्थित होते. स्वप्नील सावंत यांनी आभार मानले.

Related posts: