|Monday, January 27, 2020
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » मोफतलाल की दुनिया

मोफतलाल की दुनिया 

काळ बदलतो. अपेक्षा बदलत जातात. पन्नासेक वर्षांपूर्वी शाळा सुरू झाल्यावर वह्या पुस्तकांना ब्राऊन पेपरची कव्हर्स विकत आणून घातली जात. मध्यमवर्गीय पालक मोठा ब्राऊनपेपरचा ताव आणून तो फाडून त्याची कव्हर्स बनवीत. गरीब पालक घरातल्या जुन्या वर्तमानपत्रांचे कागद फाडून कव्हर्स बनवीत. तयार कव्हर्स विकत आणल्यावर दुकानदार त्यावर चिकटवण्यासाठी रंगीत लेबल मोफत देत. पुढे वह्या पुस्तकांवर कव्हर्स आणि लेबल्स मोफत मिळू लागली. काही दिवसांनी (निवडणुका जवळ आल्या असतील तर) पुढारी लोक वह्या पुस्तकं फुकट वाटू लागले. मग शिकवणी लावणाऱया मुलांना काही शिक्षक परीक्षेत येऊ शकणारे संभाव्य प्रश्न मोफत सांगू लागले. मोफतचं हे लोण वाढत गेलं. काही वर्षांपूर्वी पुढारी लोक मुलांना टॅब वाटू लागले. एका राज्यात तर मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांना मोफत संगणक आणि लॅपटॉपदेखील वाटले. फुकट ते पौष्टिक या संस्कारात पिढय़ा अशा तयार होत गेल्या. तरुणाईला आता कोणत्या कंपनीच्या मोबाईल कनेक्शनवर किती जीबी डेटा फुकट मिळतो याची चिंता असते. चांगला सिनेमा तिकीट न काढता मोफत डाउनलोड करता येईल का याचे विचार मनात घोळत असतात.

लोकांना नेत्यांनी मोफतची सवय लावून ठेवली आहे. संस्कारांअभावी बिघडलेली मुले वडील घरी येण्यापूर्वी सिगारेट ओढतात. त्याप्रमाणे मतदानाच्या काही दिवस आधी एखादा सण असेल तर आचारसंहिता सुरू व्हायच्या आधी पुढारी लोक मतदारांना भेटवस्तू मोफत वाटून ठेवतात. आता राजकीय नेत्याच्या सभेला कोणी तिकीट काढून जात नाही. कोणी फुकट नेऊन घरी फुकट सोडणार असेल तरच सभेला जातात. काही पुढारी भाषणात अनेक गोष्टी मोफत द्यायचं कबूल करतात. हिंदीत त्याला जुमला म्हणतात. जुमला ऐकून लोक मोफत करमणूक झाल्याचा आनंद साजरा करतात. राजकीय सभेत जुमल्याखेरीज थापादेखील मोफत ऐकायला मिळतात. पण सरकारी कचेरीत कोणी मोफत काम करील अशी शाश्वती नसते.

पुढाऱयांना वाटतं की आपण लोकांना एवढं मोफत दिल्यावर लोकांनी देखील आपल्याला काहीतरी मोफत द्यावं. म्हणून त्यांनी सगळय़ा निवडणुका एकदम घ्यायचं स्वप्न बघायला सुरुवात केलीय. म्हणजे लोकसभेसाठी हे सिंगल खर्च करणार. मग आपण त्यांना लोकसभेसाठी मत दिलं की त्यावर विधानसभेसाठी, मनपासाठी देखील मत द्यायचं. पण अजून त्याला आपण मान्यता दिलेली नाही.

Related posts: