|Wednesday, November 13, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » महिला पत्रकारांची ‘मी सुद्धा’ मोहीम

महिला पत्रकारांची ‘मी सुद्धा’ मोहीम 

पुण्यातील सिम्बायोसिस सेंटर फॉर मीडिया अँड कम्युनिकेशनमधील अनेक माजी विद्यार्थिनींनी संस्थेतील प्राध्यापाकांवर लैंगिक छळ केल्याचा आरोप केला आहे. या तक्रारींची तड लावण्याचं आश्वासन देतानाच, संस्थेने विद्यार्थिनींची माफीच मागितली आहे. काँग्रेसच्या एनएसयूआय या विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष फिरोज खान यांनीही अशाच प्रकरणात आरोप झाल्यावर, राजीनामा दिला आहे. कर्ज मंजूर करण्यासाठी शरीरसुखाची मागणी करणाऱया डीएचएफएल बँकेच्या व्यवस्थापकाला एका महिलेने फरपटत शाखेबाहेर आणलं आणि त्याला लाथाबुक्क्मयांनी तुडवून काढलं. दावणगिरीमधील या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्याचवेळी परराष्ट्र राज्यमंत्री एम. जे. अकबर यांच्याकडून लैंगिक सतावणूक झाल्याची तक्रार वीस महिलांनी केली. जेव्हा हा आरोप झाला, तेव्हा अकबर विदेश दौऱयावर होते. भारतात परतल्यावर त्यांनी एक निवेदन प्रसिद्ध करून, हे सर्व आरोप खोटे आहेत असा दावा केला. आरोप करणाऱया प्रिया रामाणी यांच्याविरुद्ध त्यांनी दावाही दाखल केला आहे. इतरही महिलांना उद्देशून, माझ्याकडे 96 वकिलांची फौज आहे आणि शिंतोडे उडवण्यापूर्वी ही गोष्ट विचारात घ्या, अशी धमकीच त्यांनी दिली.

भारतात परतल्यावर अकबर लगेचच पदत्याग करतील, अशी अपेक्षा होती. परंतु परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्यासमवेत एका कार्यक्रमास त्यांनी हजेरीही लावली. मी राजीनामा बिलकुल देणार नाही, असा पवित्रा त्यांनी घेतला. परंतु त्यानंतरही त्यांच्याविरुद्ध तक्रारी सुरूच रहिल्या. तुषिता पटेल या ‘दि एशियन एज’ वृत्तपत्राच्या प्रतिनिधीने, एकदा अकबर अंतर्वस्त्रातच समोर आले आणि त्यांनी जबरदस्तीने माझं चुंबन घेतलं, असा आरोप केला. रूथ डेव्हिड या ब्रिटिश पत्रकाराने सांगितलं आहे की, अकबर यांनी फोन करून तिला कार्यालयात बोलावलं आणि ते अश्लील चाळे करू लागले. सुपर्णा शर्मा या ‘दि एशियन एज’च्या दिल्ली आवृत्तीच्या निवासी संपादकाच्या अंतर्वस्त्राला अकबर यांनी हात घातला होता. अकबर यांनी आपलं आयुष्य उद्ध्वस्त केल्याचा आरोप प्रेमा सिंग बिंद्रा यांनी केला आहे. अकबर जेव्हा माझ्याशी बोलत, तेव्हा त्यांची नजर माझ्या उरोभागावर असे, असं कादंबरी वाडे यांनी म्हटलं आहे. सार्वजनिकरीत्या अकबर यांची इतकी छीःथू झाली की, त्यांना शेवटी राजीनामा द्यावाच लागला. अकबर जर निर्दोष असतील, तर न्यायालयात तसं सिद्ध होईलही. पण तोपर्यंत हे लक्षात घ्यायला हवं की, आमदार, खासदार, मंत्री हे संशयातीत असले पाहिजेत.

‘द वायर’ या वेबसाइटवर ‘जन गण मन’ हा अत्यंत प्रभावी कार्यक्रम करणारे विनोद दुआ यांच्यावरही काही स्त्रियांनी आपल्याला त्रास दिल्याचा आरोप केला आहे. या आरोपांचा दुआ यांनी इन्कार केला आहे. तीस वर्षांपूर्वीच्या या घटना आहेत. परंतु आपण लोकांना उत्तरदायी असल्यामुळे एक आठवडा आपला शो स्थगित करत आहोत, अशी घोषणा त्यांनी केली आहे. या काळात ‘द वायर’ने आपल्यावरील आरोपांची चौकशी करावी, असंही त्यांनी म्हटलं आहे. 5 ऑक्टोबर रोजी संध्या मेनन या मुक्त पत्रकाराने ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या संपादकांवर सतावणूक केल्याचा आरोप केला. या आरोपाची चौकशी होईलच. पण मेनन यांच्या ट्विटनंतर अनेक महिला पत्रकारांनी कामाच्या ठिकाणी होत असलेल्या सतावणुकीचे अनुभव ट्विटरवरून शेअर केले. खेदाची गोष्ट अशी की, ‘इंडियन एक्सप्रेस’, ‘हिंदुस्तान टाइम्स’, ‘द हिंदु’ या वृत्तपत्रात या टिप्पण्यांच्या आधारे कोणतंही वृत्त आलं नाही. संपादकीय आलं नाही. ‘एनडीटीव्ही’च्या निधी राजदान यांचा आणि मारया शकील यांच्या ‘सीएनएन न्यूज 18’ वरील चर्चा सोडून, इंग्रजी चॅनेलवर कोणी हा विषय घेतलाच नाही.

अकबर यांच्याबाबत आरोप होताच हे आरोप करणाऱया महिला कशा ‘इंग्रजी’ (म्हणजे उच्चभ्रू वर्तुळातल्या) वर्तमानपत्रातल्या आहेत आणि साऱयाजणी भाजपविरोधी भूमिका घेणाऱया कशा आहेत, अशी पोस्ट व्हॉट्सपवर फिरत होती. म्हणजे यावरून राजकारण करण्यास कोणी सुरुवात केली, ते स्पष्ट आहे.

हिंदी माध्यमातली स्थिती काय आहे? राजकमल पब्लिकेशनच्या सहसंपादक वर्तिका मिश्र यांनी एक अनुभव सांगितला आहे. एका प्रसिद्ध पत्रकाराने आपली स्वतंत्र वेबसाईट सुरू करून, त्यात महिलांवर एक सदर सुरू केलं. एका पत्रकाराने केलेल्या लैंगिक गुन्हय़ाबद्दल वर्तिका यांनी या वेबसाईटला माहिती दिली. या वेबसाईटचा संस्थापक उत्तरला, ‘माझं असं मत आहे की, जेव्हा एखादी मुलगी एखाद्या मुलाच्या केबिनमध्ये जाते, तेव्हा ती सारं काही मागे सोडून तिथे जाते.’ हे किती भयंकर आहे!

‘हिंदी किसान’चा प्रसिद्ध पत्रकार दिलीप खानविरुद्ध गेल्या दहा महिन्यात पाच तक्रारी आल्या आहेत. या महिलांनी समाजमाध्यमातूनही आपलं गाऱहाणं वेशीवर टांगलं आहे. परिणाम असा झाला की, दहा दिवस दिलीप समाजमाध्यमातून गायब झाला. पण त्यानंतर तो पुन्हा परतला आणि सर्व काही सुरळीत झालं…‘शुक्रवार’ या मासिकाच्या प्रतिनिधी म्हणून पूजा सिंग काम करतात. पूर्वी त्या दिल्लीतील एका राष्ट्रीय वृत्तपत्राच्या पुरवणीचं काम बघत. एक दिवस या पुरवणीच्या संपादकाने, ‘माझं तुझ्यावर प्रेम आहे. तुझ्यासारखी मुलगी मी बघितलीच नाही’ असं चहा पिता पिता पूजाला सांगितलं. पूजाने तिथल्या तिथे त्याला झापलं. पण त्यानंतर रात्री कामावरून घरी जाताना मेट्रो स्टेशनपर्यंत तो तिचा पाठलाग करत असे. त्यानं पूजाशी कामात सहकार्य करणं थांबवलं आणि तिच्या चारित्र्यावर चिखलफेक करू लागला. ‘यूथ की आवाज’ या हिंदी वृत्तपत्राच्या इतिशरण या सहसंपादक आहेत. त्या पूर्वी पाटण्याला ‘नई दुनिया’त उमेदवारी करत. तेव्हा त्या अगदी तरुण होत्या. अनेकदा कामाबद्दल उत्तेजन देत असल्याच्या नावाखाली वडिलांच्या वयाचा ब्युरो चीफ तिच्याशी लगट करायचा. एकदा तर रविवारी तिला कामावर बोलावलं आणि केबिनमध्ये बोलावून तो तिच्या अंगचटीला गेला. त्याकाळात तक्रार करण्याचं धाडस तिला झालं नाही, हे समजण्यासारखं आहे. इतक्मया वर्षांनी तक्रार करण्याची उपरती का झाली? तेव्हा तोंडाला कुलूप का लावलं होतं असे सवाल नेहमीच उपस्थित केले जातात.

आता महिलांना अधिक धैर्य प्राप्त झालं आहे. सर्वसाधारणपणे काही अपवाद वगळता, त्या उगाचच कोणाची बदनामी करणार नाहीत. केली, तर त्याची त्यांना शिक्षा होईल. प्रसारमाध्यमातील स्त्रियांनी समाजातील गोरगरीब, अन्यायग्रस्त महिलांच्या वेदनेला हुंकार प्राप्त करून द्यावा, असं म्हटलं जातं. महिला पत्रकारच स्वतःवरील अन्यायाबाबत गप्प बसल्या, तर मग कुणाकडे पहायचं?

नंदिनी आत्मसिद्ध

Related posts: