|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » Top News » ध्रुव जोशी यास ‘शतायुषी आरोग्य पुरस्कार जाहीर’

ध्रुव जोशी यास ‘शतायुषी आरोग्य पुरस्कार जाहीर’ 

 

पुणे/ प्रतिनिधी :

‘शतायुषी’तर्फे प्रतिवर्षी देण्यात येणारे ‘शतायुषी आरोग्य पुरस्कार’ मंगळवारी पुण्यात जाहीर करण्यात आले. यंदाच्या ‘शतायुषी सर्वोत्कृष्ट आरोग्य पुरस्कारा’साठी ध्रुव जोशी याची, ‘सर्वोत्कृष्ट सामाजिक आरोग्य सेवा पुरस्कारा’करिता पालघरच्या डॉ. सुजाता गोडा यांची, ‘शतायुषी सर्वोत्कृष्ट वैद्यकीय विद्यार्थी पुरस्कारा’साठी भारती विद्यापीठाच्या मेडिकल कॉलेजचा विद्यार्थी डॉ. शौनक पटवर्धन याची निवड करण्यात आली आहे. 28 ऑक्टोबर रोजी रविवारी सायंकाळी 6 वाजता टिळक स्मारक मंदिरमध्ये या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे.

‘शतायुषी सर्वोत्कृष्ट आरोग्य पुरस्कार’प्राप्त ध्रुव जोशी याला ‘सेरेब्रल पाल्सी’चा त्रास होता. त्यामुळे इतर बालकांप्रमाणे तो मांडी घालून बसू शकत नव्हता, उभा राहू शकत नव्हता. पेडिऍट्रिक अस्थिविकारतज्ञ, तज्ञांनी फिजिओथेरपी आणि इतर उपचार त्याच्यावर केले. त्याचे पाय दोन महिने प्लॅस्टरमध्ये ठेवण्यात आले. वयाच्या दहाव्या व बाराव्या वर्षी त्याच्या पायांवर दोन अवघड शस्त्रक्रिया करण्यात आल्या. यातून उभारी मिळण्यासाठी त्याला आई-वडिलांनीही भक्कम मानसिक आधार दिला. आपल्या जिद्दीच्या बळावर ध्रुव आता स्वतःच्या पायावर उभा राहून सामान्य मुलांप्रमाणे चालू, धावू शकत आहे. ध्रुव हा ‘तरुण भारत’च्या पुणे कार्यालयाचे जाहिरात प्रतिनिधी सुनील जोशी यांचा मुलगा आहे.

‘सर्वोत्कृष्ट सामाजिक आरोग्य सेवा पुरस्कार’ पालघरच्या डॉ. सुजाता गोडा यांनी 16 हजारांहून अधिक आदिवासी रुग्णांना जीवनदान दिले आहे. विक्रमगड तालुक्यातील 25 गावांमध्ये आरोग्य सुविधा निर्माण करीत ही गावे कायमस्वरूपी कुपोषणमुक्त करण्याची त्यांची कामगिरी अतुलनीय आहे. ‘शतायुषी सर्वोत्कृष्ट वैद्यकीय विद्यार्थी पुरस्कार’प्राप्त भारती विद्यापीठाच्या मेडिकल कॉलेजचा विद्यार्थी डॉ. शौनक पटवर्धन याने शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच खेळ, सांस्कृतिक उपक्रमांमध्ये विशेष प्राविण्य प्राप्त केले आहे. तसेच शतायुषी आरोग्य दिवाळी अंकाची घोषणाही या वेळी करण्यात आली.