|Sunday, June 16, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » आठवडाभर दिवसाआड पाणीपुरवठा

आठवडाभर दिवसाआड पाणीपुरवठा 

प्रतिनिधी /कोल्हापूर :

शिंगणापूर उपसा केंद्रातील ट्रान्सफॉर्मर जळाल्याने शहरावर पुन्हा एकदा दिवसाआड पाणीपुरवठय़ाची नामुष्की ओढवली आहे. येथील चार पैकी एक पंप बंद असल्यामुळे हा निर्णय घेतला असल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली आहे. संपूर्ण ए. बी व निम्मा ई वॉर्डमध्ये शनिवारी (दि.27) सकाळपासून याची अंमलबजावणी होणार असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाने दिली आहे.

गेल्या चार दिवसांपासून शिंगणापूर उपसा केंद्रातील ट्रॉन्सफॉर्मर जळल्याने संपूर्ण ए. बी व निम्मा ई वॉर्डमध्ये पाणीपुरवठय़ावर परिणाम झाला आहे. अपुरा, कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्यामुळे नागरीकांची पाण्यासाठी धावपळ सुरु आहे. ट्रॉन्सफॉर्मर दुरुस्तीसाठी सात दिवस लागणार आहेत. त्यामुळे पुढील आठवडाभर ए.बी. व निम्मा ई वॉर्डमध्ये दिवसआड पाणीपुरवठा करावा लागणार आहे. यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी गुरुवारी (दि.25) महापौर शोभा बोंद्रे, गटनेते शारंगधर देशमुख, सुनिल पाटील, विजय सूर्यवंशी, मनपा अधिकारी यांच्यामध्ये बैठक झाली. यावेळी दिवसाड पाणीपुरवठय़ावर शिक्कामोर्तब झाला.

 जल अभियंता सुरेश कुलकर्णी म्हणाले, शिंगणापूर जल उपसा केंद्राकडील एक ट्रान्सफॉर्मर नादुरूस्त झाल्याने शिंगणापूर ते आपटेनगर पंपींग स्टेशनपर्यंत पाणी पुरवठा करणाऱया एकूण 4 जल उपसा पंपापैकी एका वेळेस फक्त 3 पंप चालू ठेवणे शक्य आहे. ट्रान्सफॉर्मर दुरूस्तीचे काम तातडीने हाती घेण्यात आले आहे. तरीही दुरूस्तीसाठी सात दिवसाचा आवधी लागणार आहे. या कालावधीत शहरातील ए, बी व ई वॉर्ड (बावडा फिल्टर हाऊस वरून पाणी पुरवठा होणारा भाग वगळून) या सर्व परिसरात दिवसआड पाणी पुरवठा करावा लागणार आहे.

गटनेते शारगंधर देशमुख म्हणाले, पाणीपुरवठाबाबतीत प्रशासनास नेहमी सर्व सदस्यांचे सहकार्य असते. प्रशासनानेही सदस्यांना सहाकार्य केले पाहीजे. दिवसाआड पुरवठय़ाला विरोध नाही. मात्र, या कालावधीत सब्ंाधित भागातील नागरीकांना पिण्याच्या पाण्याची सोय होण्याच्या दृष्टीने महापालिकेकडील उपलब्ध टँकरव्दारे पाणी वाटपाचे नियोजन करावे. गटनेते विजय सूर्यवंशी म्हणाले, या कालावधीत टँकरचे योग्य नियोजन ठेवा, परिस्थिती पूर्वपदावर येईपर्यंत अधिकाऱयांनी संबंधित प्रभागातील नगरसेवकांशी समन्वय राखावा.