|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » क्रिडा » पूजाला कुस्ती वर्ल्ड चॅम्पियनशिपचे कांस्य

पूजाला कुस्ती वर्ल्ड चॅम्पियनशिपचे कांस्य 

57 किलोग्रॅम वजनगटात भारताला यश, रितू फोगट, साक्षी मलिक मात्र अपयशी, ग्रीको-रोमन गटातही निराशा

वृत्तसंस्था/ बुडापेस्ट

पूजा धांडाने 57 किलोग्रॅम वजनगटात कांस्य जिंकल्यानंतर भारताने येथे सुरु असलेल्या 2018 कुस्ती वर्ल्ड चॅम्पियनशिपमधील दुसऱया पदकाची कमाई केली. पूजाने नॉर्वेच्या ग्रेस बुलेनला 10-7 अशा फरकाने नमवत कांस्य प्राप्त केले. यापूर्वी बजरंग पुनियाने वर्ल्ड चॅम्पियनशिपमधील पहिल्या पदकाची नोंद केली होती. त्या यादीत आता पूजाने सन्मानाचे स्थान प्राप्त केले आहे.

महिला गटात पूजापूर्वी अलका तोमर, गीता फोगट व बबिता फोगट या तिघीच महिला मल्लांना वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये प्रत्येकी 1 कांस्य जिंकता आले आहे. वास्तविक, आजच्या लढतीत पूजाने पहिल्या सत्रात 6-1 अशी जोरदार आघाडी घेतली होती. पण, दुसऱया सत्रात ग्रेसच्या अतिशय आक्रमक खेळासमोर तिला सातत्याने अपयशाचा सामना करावा लागला. केवळ अंतिम क्षणी ग्रेसला पायात गुंडाळता आल्यानेच तिला कांस्यपदक जिंकता आले.

त्यापूर्वी, पूजाने अझरबैजानच्या ऍलियोना कोलेस्निलला 8-4 असे पराभूत करत कांस्यपदकाच्या लढतीसाठी आपले स्थान निश्चित केले होते. भारताच्या दुर्दैवाने रितू फोगटला मात्र यशापासून दूरच रहावे लागले. 50 किलोग्रॅम वजनगटात तिने ओक्साना लिव्हाचविरुद्ध जोरदार सुरुवात केली होती. पण, अंतिमतः तिला 10-5 अशा फरकाने पराभव स्वीकारावा लागला.

रिओ ऑलिम्पिक कांस्यजेती साक्षी मलिकला देखील रिपेचेज राऊंड पार करता आले नाही. तिला हंगेरीच्या मॅरियाना सॅस्टिनविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला. अन्य भारतीय प्रतिस्पर्ध्यांप्रमाणेच साक्षी देखील पहिल्या सत्रात आघाडीवर होती. पण, मॅरियानाने दुसऱया सत्रात आक्रमणावर भर दिल्यानंतर तिचीही निराशाच झाली. दुसऱया सत्रात अवघ्या 55 सेकंदाचा अवधी बाकी असताना साक्षीकडून मोठी चूक झाली आणि इथेच मॅरियानाने निर्णायक वर्चस्व प्राप्त केले.

ग्रीको-रोमन मल्लांचेही अपयश

पुरुष गटातील ग्रीको-रोमन भारतीय मल्लांच्या पदरीही अपयशच आले. विजय (55 किलोग्रॅम), गौरव शर्मा (65 किलोग्रॅम), कुलदीप मलिक (72 किलोग्रॅम) व हरप्रीत सिंग (75 किलोग्रॅम) यांचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. विश्व कनिष्ठ कांस्यजेत्या विजयला चीनच्या लिगुयो काओकडून 1-9 तर गौरव शर्माला पोलंडच्या जॅसेक मायकलविरुद्ध 3-7 अशा फरकाने पराभवाला सामोरे जावे लागले. कुलदीप मलिकला जपानच्या तोमोहिरो इनोयूकडून 9-0 तर हरप्रीत सिंगला मोरोक्कोच्या झिएद ऐत ऑग्रॅमकडून 4-15 अशा एकतर्फी फरकाने पराभूत व्हावे लागले.