|Sunday, February 23, 2020
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » मनपा निवडणुकीचे बिगुल वाजले; मतदारयाद्या तयारीस प्रारंभ

मनपा निवडणुकीचे बिगुल वाजले; मतदारयाद्या तयारीस प्रारंभ 

जानेवारीमध्ये अधिसूचना जारी होण्याची शक्यता

प्रतिनिधी/ बेळगाव

महापालिका वॉर्डरचना आणि आरक्षणाविरोधात न्यायालयात वाद सुरू आहे. मात्र, निवडणुका घेण्याच्यादृष्टीने निवडणूक आयोगाने आवश्यक तयारी सुरू केली आहे. वॉर्ड पुनर्रचनेचे काम यापूर्वीच पूर्ण झाले असून आता वॉर्डनिहाय मतदारयाद्या तयार करण्यासाठी कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. दि. 26 डिसेंबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

महापालिका सभागृहाची मुदत फेबुवारी 19 पर्यंत आहे. महापालिका निवडणुकांकडे इच्छुकांचे लक्ष लागले आहे. वॉर्डनिहाय आरक्षण यापूर्वीच जाहीर झाले आहे. यामुळे निवडणुका घेण्याच्यादृष्टीने निवडणूक विभागाने तयारीस प्रारंभ केला आहे. दर दहा वर्षांनी वॉर्ड पुनर्रचना करण्यात येते. यामुळे यंदा नव्याने वॉर्ड पुनर्रचना करण्यात आली आहे. पण वॉर्ड पुनर्रचना करताना महापालिकेच्या अधिकाऱयांनी शहरवासियांना विश्वासात घेतले नाही. जनतेला अंधारात ठेऊन वॉर्ड पुनर्रचना करण्यात आल्याने आक्षेप घेण्यात आला आहे. आरक्षणालाही काही नगरसेवक व नागरिकांचा विरोध आहे. यामुळे वॉर्ड पुनर्रचना आणि आरक्षणाबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेची सुनावणी यापूर्वी दोन वेळा लांबणीवर पडली. सोमवार दि. 29 रोजी याचिकेची सुनावणी होणार आहे. मात्र, त्यापूर्वीच निवडणूक आयोगाने मतदारयाद्या तयार करण्याच्या कार्यक्रमाची घोषणा केली आहे.

वॉर्डचे नकाशे तयार करणे व हद्द निश्चित करून मतदारयाद्या तयार करण्यासाठी दोन महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे. मतदार यादी तयार करण्याची जबाबदारी पालिकेचे अभियंते, महसूल निरीक्षक, क्लार्क व दफेदार यांच्यावर सोपविण्यात आली आहे. याबाबतचा आदेश कौन्सिल विभागाकडून देण्यात आला असून सोमवारपासून या कामाला प्रारंभ होणार आहे. वॉर्डनिहाय मतदारयाद्या तयार करून प्रसिद्ध करणे, नव्याने नावे दाखल करणे, नाव कमी करणे, नावातील चुकीची दुरुस्ती आदी प्रक्रिया पूर्ण करून 26 डिसेंबरपर्यंत अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्याची सूचना निवडणूक आयोगाने केली आहे. यामुळे जानेवारीनंतरच निवडणुकीची घोषणा होण्याची शक्मयता आहे.

महापालिका निवडणुका डिसेंबरपूर्वी होतील, अशी अपेक्षा होती. पण वॉर्ड पुनर्रचना आणि आरक्षण याबाबतचा वाद निर्माण झाल्याने निवडणूक प्रक्रिया लांबणीवर पडली आहे. मतदारयाद्या तयार केल्यानंतर निवडणुकीची अधिसूचना जारी होण्याची शक्मयता आहे. यामुळे या सभागृहातील नगरसेवकांना पूर्ण मुदत मिळणार आहे.

Related posts: