|Sunday, November 17, 2019
You are here: Home » राष्ट्रीय » सैन्याची एलओसीवर कारवाई

सैन्याची एलओसीवर कारवाई 

पाकिस्तानला प्रत्युत्तर : शत्रूचे सीमेवरील सैन्य मुख्यालय उद्ध्वस्त, उपग्रहीय छायाचित्रांचा पुरावा

  वृत्तसंस्था/ जम्मू

पाकिस्तानकडून नियंत्रण रेषेवर (एलओसी) वारंवार शस्त्रसंधी उल्लंघन करण्यात आल्यानंतर भारतीय सैन्याने पुन्हा एकदा प्रत्युत्तरादाखल आक्रमक कारवाई केली आहे. 23 ऑक्टोबर रोजी पुंछ जिल्हय़ाला लागून असलेल्या नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आला होता. यावर सैन्याने सर्जिकल स्ट्राइकच्या धर्तीवरच नियंत्रण रेषेला लागून असलेले पाकिस्तानी सैन्याचे प्रशासकीय मुख्यालय उद्ध्वस्त पेले आहे. सैन्याच्या या कारवाईत पाकिस्तानी सैन्याला मोठे नुकसान झाल्याचे समजते.

भारतीय सैनिकांवर पाकिस्तानच्या बॅट पथकाद्वारे 21 ऑक्टोबर रोजी हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात 3 भारतीय सैनिकांना हौतात्म्य आले होते तर एक सैनिक जखमी झाला होता. पाकिस्तानच्या या आगळीकीनंतर नियंत्रण रेषेवर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांच्या सैन्याधिकाऱयांनी हॉटलाईनवर झालेल्या चर्चेत नियंत्रण रेषेवरील तणावाचा मुद्दा उपस्थित केला होता.

पाकच्या गोळीबारानंतर कारवाई

23 रोजी झालेल्या या चर्चेच्या दिवशीच पाकिस्तानी सैन्याने पुंछ आणि झल्लाह सेक्टरच्या अनेक भागांमध्ये 120 आणि 182 एमएम मोर्टारद्वारे गोळीबार केला होता. याच्या प्रत्युत्तरादाखल भारतीय सैन्याने कारवाई करत नियंत्रण रेषेनजीक असलेल्या पाकिस्तानी सैन्याचे प्रशासकीय मुख्यालय जमीनदोस्त केले आहे. सैन्याच्या या मोहिमेनंतर सोमवारी याची उपग्रहीय छायाचित्रे समोर आली आहेत.

लाँचिंग पॅड उद्ध्वस्त

भारतीय सैन्याच्या कारवाईत पीओकेतील हजीरा आणि रावळकोट सेक्टरमधील दहशतवाद्यांचे लाँचिंग पॅड देखील नष्ट झाले आहेत. पाकिस्तान याच लाँचिंग पॅडद्वारे दहशतवाद्यांना भारतात घुसविण्याचा प्रयत्न करतो. सर्जिकल स्ट्राइकप्रमाणेच सैन्याच्या या हल्ल्यात दहशतवाद्यांचे अनेक लाँचिंग पॅड नष्ट झाल्याची माहिती मिळाली आहे.

पाकिस्तानी खंदक नष्ट

या अगोदर देखील नियंत्रण रेषा आणि सीमेवर पाकिस्तानी गोळीबाराच्या प्रत्युत्तरादाखल भारतीय सुरक्षा दलांनी कठोर कारवाई केली आहे. मे महिन्यात देखील पाकिस्तानने नौशेरा सेक्टरच्या भागांना लक्ष्य करत तोफगोळय़ांचा मारा केला होता. याच्या प्रत्युत्तरादाखल बीएसएफच्या जवानांनी क्षेपणास्त्र हल्ल्याद्वारे पाकिस्तानी खंदक नष्ट केला होता. सीमा सुरक्षा दलाने या धडक कारवाईची चित्रफित प्रसारमाध्यमांवर प्रसारित केली होती.

सैन्यप्रमुखांचा इशारा

मागील काही दिवसांपासून सैन्याचे अधिकारी सातत्याने पाकिस्तानच्या विरोधात कठोर कारवाईबद्दल बोलत होते. पाकिस्तानने आगळीक न रोखल्यास भारतीय सैन्यासमोर अनेक पर्याय आहेत. पाकिस्तानच्या प्रत्येक आगळीकीला भारतीय सैन्य चोख प्रत्युत्तर देणार असल्याचे सैन्यप्रमुख बिपिन रावत यांनी म्हटले होते.

Related posts: