|Monday, February 24, 2020
You are here: Home » आवृत्ती » सातारा » मंत्री पाटीलांकडून आश्वासनाला तिलाजंली

मंत्री पाटीलांकडून आश्वासनाला तिलाजंली 

प्रतिनिधी/ म्हसवड

पिंगळी तलावात 15 दिवसांत पाणी सोडण्याचा अल्टीमेटम मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी गेल्या वीस दिवसांपूर्वी दिला होता. या घोषणेने सात गावातील पाणी टंचाई दुर होणार असल्याने नागरिकांच्यात या घोषणेने आशा पल्वीत झाल्या होत्या, मात्र दादाचा पंधरा दिवसांचा अल्टीमेटम संपून गेला तरी तलावात उरमोडीचे पाणी आले नसल्याने नागरिकांमध्ये नाराजीचा सुर निघत आहे. त्यामुळे दुष्काळ सुसह्य करण्यासाठी प्रशासनाला चांगलीच कसरत करावी लागणार आहे.

यावर्षी पाऊस न झाल्याने आगामी काळात तीव्र दुष्काळाला सामोरे जावे लागणार आहे. आत्तापासूनच अनेक भागात पाणीटंचाईच्या झळा बसू लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. माणमधील दहिवडी, गोंदवले बुद्रुक या गावांना पाणीपुरवठा करणारा आंधळी तलाव कोरडा पडल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. ब्रिटिशकालीन पिंगळी तलावात पाणी येण्याचे नैसर्गिक मार्ग संपल्याने उरमोडी योजनेतूनच या तलावात पाणीसाठा करण्याचा पर्याय उरला आहे. या तलावात पाणीसाठा झाल्यास दहिवडी व गोंदवल्यासह पिंगळी बुद्रुक, पिंगळी खुर्द, गोंदवले खुर्द, लोधवडे, मनकर्णवाडी या भागातील पाणीप्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. त्यामुळे उरमोडी योजनेतून हा तलाव भरण्यासाठी पोट कालव्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहेत.

सध्या हे काम अंतिम टप्प्यात आले असून पाण्याचीही मोठी कमतरता जाणवू लागली आहे. त्यामुळे पिंगळीत पाणी सोडण्याच्या मागणीने चांगलाच जोर धरला आहे. नुकत्याच झालेल्या दुष्काळी पाहणी दौऱयात मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे याबाबत लोकांनी मागणी केली होती. त्यावेळी यांनी पंधरा दिवसात पिंगळीत पाणी सोडण्याचा शब्दही दिला होता. परंतु यापूर्वी देखील अनेकांनी असा शब्द देऊन सुद्धा पाणी आले नव्हते. त्यामुळे आता तरी पिंगळीत पाणी येणार का? याबाबत गेल्या पंधरा दिवसांत सोशल मीडियावर चर्चेला उधाण आले होते.   भविष्यात टंचाईची भीषणता उग्र रूप धारण करण्याचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पिंगळीत पाणी न आल्यास प्रशासनाला लोकांची तहान भागविण्यासाठी चांगलीच कसरत करावी लागणार आहे.

Related posts: