|Thursday, September 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » मान हलवायला मी काही नंदीबैल नाही !

मान हलवायला मी काही नंदीबैल नाही ! 

प्रतिनिधी /पणजी :

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या खासगी बंगल्यावर गुरुवारी झालेल्या भाजपच्या गाभा समितीच्या बैठकीस माजी मुख्यमंत्री व भाजपचे बंडखोर नेते लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी उपस्थित राहण्यास नकार दिला. ‘केवळ मान हलवित बसण्यास मी काही नंदीबैल नाही’ अशा शब्दांत पार्सेकर यांनी गाभा समितीच्या बैठकीचा पोलखोल केला.

भाजपचे तिन्ही खासदार नवी दिल्लीला रवाना झाले आहेत. दिल्लीमध्ये पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्याकडे राज्यातील खाणींबाबत चर्चा करण्यापूर्वी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या बरोबर गाभा समितीची बैठक प्रदेश भाजप अध्यक्ष विनय तेंडूलकर यांनी आयोजित केली होती. पार्सेकर वगळता इतर सर्व सदस्य हजर होते. त्यांना  बैठकीस निमंत्रण देण्यात आले होते. मात्र सध्या संतप्त बनलेल्या या माजी मुख्यमंत्र्याने बैठकीवर बहिष्कार घातला आहे.

मान डोलवायला मी नंदीबैल नाही

बहिष्काराचे कारण विचारता पार्सेकर यांनी अत्यंत रोचकपणे काही गोष्टींचा गौप्यस्फोट केला. गाभा समितीची बैठक बोलवायची, अगोदरच निर्णय घेऊन यायचे, बैठकीत ते जाहीर करायचे. इतरांनी केवळ माना डोलवायच्या. बस्स झाला हा प्रकार. आपण मान डोलवायला काही नंदीबैल नाही, असे पार्सेकर म्हणाले. त्यामुळे संपूर्ण गोव्यात त्यांच्या या निवेदनाने एकच खळबळ माजवून दिली आहे.

या बैठकीस विनय तेंडूलकर, नरेंद्र सावईकर, संजीव देसाई, दामू नाईक, सदानंद शेट तानावडे, राजेंद्र आर्लेकर, आदी अनेकजण उपस्थित होते. त्यानंतर तिन्ही खासदार व सदानंद तानावडे हे नवी दिल्लीला रवाना झाले.