|Sunday, September 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » जलवाहिनी दुरुस्तीसाठी पाणी पुरवठा राहणार बंद

जलवाहिनी दुरुस्तीसाठी पाणी पुरवठा राहणार बंद 

बेळगाव / प्रतिनिधी

हिंडलगा पंपिंग स्टेशनमधून लक्ष्मी टेकडी जलशुद्धीकरण केंद्रात पाणी पुरवठा करणाऱया जलवाहिनीला बॉक्साईट रोडनजीक गळती लागल्याने मोठय़ा प्रमाणात पाणी वाहत आहे. या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम दि. 3 रोजी हाती घेण्यात येणार असून जलशुद्धीकरण केंद्रात होणारा पाणी पुरवठा बंद ठेवला जाणार आहे. परिणामी 24 तास योजनेसह शहरातील पाणी पुरवठय़ात व्यत्यय येणार आहे.

शहरात तसेच हिंडलगा पंपिंगस्टेशनपासून जलशुद्धीकरण केंद्राला पाणी पुरवठा करणाऱया जलवाहिन्यांना ठिकठिकाणी गळती लागली आहे. या गळतीद्वारे मोठय़ा प्रमाणात पाणी वाहत असून याकडे पाणी पुरवठा मंडळाचे दुर्लक्ष झाले होते. याबाबत तरुण भारतने वृत्त प्रसिद्ध करून पाणी पुरवठा मंडळाच्या अधिकाऱयांसह महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधले होते. याची दखल घेऊन महापौर बसाप्पा चिकलदिन्नी यांनी पाणी पुरवठा मंडळाच्या अधिकाऱयांकडे चौकशी केली होती. तसेच या गळती निवारणाचा आदेश दिला होता. यामुळे बॉक्साईट रोडनजीक लागलेल्या गळती निवारणाचे काम चार दिवसांपासून हाती घेण्यात आले आहे. मात्र पाणी पुरवठा बंद ठेवल्याखेरीज दुरुस्तीचे काम करता येणार नाही. यामुळे शनिवार दि. 3 रोजी पाणी पुरवठा बंद ठेवून जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. बॉक्साईट रोडनजीक गळती लागल्याने मोठय़ा प्रमाणात पाणी वाहत आहे. या जलवाहिनीद्वारे 24 तास पाणी पुरवठा सुरू असतो. या गळतीद्वारे सातत्याने पाणी वाया जात आहे. यामुळे दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे.

दुरुस्तीच्या कामासाठी शहराला होणारा पाणी पुरवठा पूर्णत: ठप्प होणार आहे. यामुळे 24 तास योजनेसह शहरातील कोणत्याच भागाला पाणी पुरवठा करणे शक्मय नाही. यामुळे नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पाणी पुरवठा मंडळाने केले आहे.