|Sunday, December 15, 2019
You are here: Home » Top News » टिमविला ‘बी डबल प्लस’ श्रेणी

टिमविला ‘बी डबल प्लस’ श्रेणी 

पुणे / प्रतिनिधी :

 लोकमान्य टिळकांचे शैक्षणिक स्मारक असलेल्या आणि विद्यार्थी-पालकांच्या भरभक्कम पाठबळावर शताब्दीकडे वाटचाल करणाऱया टिळक महाराष्ट्र विद्यापीठाला ‘नॅक’कडून ‘बी डबल प्लस’ श्रेणी मिळाली आहे. शैक्षणिक संस्थांच्या गुणवत्तेचे मूल्यमापन करणाऱया ‘नॅक’ च्या समितीने सप्टेंबरमध्ये विद्यापीठाची पाहणी केली होती. यापूर्वी सन 2015 मध्ये विद्यापीठाला ‘ब’ श्रेणी मिळाली होती.

 गुणवत्तेच्या आधारावर उच्च श्रेणी प्राप्त करण्यासाठी टिमविने तिसऱया वषीच स्वतःहून नॅशनल ऍसेसमेंट ऍन्ड ऍक्रिडेशन कॉन्सिल (नॅक) कडे अर्ज सादर केला होता. या पार्श्वभूमीवर टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या शैक्षणिक गुणवत्तेवर ‘नॅक’ची मोहोर उमटली आहे. संस्कृत आणि भारतीय विद्या, आयुर्वेद, सामाजिक शास्त्रे या टिमवितील सर्वांत जुन्या विभागांच्या शैक्षणिक गुणवत्तेची परंपरा ‘नॅक’कडून अधोरेखित झाली. संस्कृत विभागाकडून आयोजित केले जाणारे वासंतिक वर्ग, ‘हेरिटेज वॉक’ संकल्पना, आयुर्वेद विभागाचे संशोधन क्षेत्रातील जागतिक स्तरावरील कार्य याची दखल ‘नॅक’ने घेतली असून, या विभागांचे शैक्षणिक आणि संशोधनात्मक कार्य उल्लेखनीय आहे, असे ‘नॅक’ समितीने नमूद केले. त्याचबरोबर मास कम्युनिकेशन आणि हॉटेल मॅनेजमेंट या दोन विभागांमधील प्रात्यक्षिकांवर आधारित अभ्यासक्रमाचा आणि उपक्रमांचे समितीने विशेष कौतुक केले. नर्सिंग, फिजिओथेरपी, लॉ या विभागांमार्फतही उत्तम शैक्षणिक व संशोधनात्मक कार्य होत असल्याचे समितीने म्हटले आहे. 

 गुणवत्तेची नवी भरारी

 जाणीवपूर्वक निर्माण केलेले नकारात्मक वातावरण पुसून टिळक महाराष्ट्र विद्यापीठाने अवघ्या दोन वर्षात गुणवत्तेची नवी भरारी घेतली आहे. गुणवत्तेची पातळी वाढविण्याचे एकमेव ध्येय ठेवून गेली दोन वर्षे आम्ही सातत्याने प्रयत्न केले.  प्राध्यापक, कर्मचारी, हजारो विद्यार्थी या सर्वांच्याच एकत्रित प्रयत्नांचे हे यश आहे. गेल्या दोन वर्षात असंख्य शैक्षणिक आणि संशोधनात्मक उपक्रम विद्यापीठाने राबविले. गुणवत्ता श्रेणीतील वाढ हे त्याचेच फलित होय. आम्ही ‘अ’ श्रेणीच्या जवळ पोहोचलो असून, शताब्दी वर्षासह आगामी काळात गुणवत्तेचे नवे मानदंड आम्ही निश्चितपणे निर्माण करू, असा विश्वास विद्यापीठाचे कुलगुरू दीपक टिळक यांनी व्यक्त केला.

Related posts: