|Thursday, November 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » सिंधुदुर्गातील मासे वाहतूकदार आक्रमक

सिंधुदुर्गातील मासे वाहतूकदार आक्रमक 

गोव्याकडे मासे वाहतूक करणारी इन्सुलेटेड वाहने झारापला रोखली : बेकायदेशीर मासे वाहतूक करणारी खासगी बसही पकडली : आरटीओकडून दंडात्मक कारवाई : गोव्याकडे मासे वाहतूक करणारी वाहने जाऊ देणार नाही!

वार्ताहर / कुडाळ:

सिंधुदुर्ग जिल्हय़ातून मासे वाहतूक करणाऱया वाहनांवर गोवा सरकारने बंदी घातल्याने जिल्हय़ातील मासे वाहतूक वाहनधारक आक्रमक बनले आहेत. मंगळवारी रात्री रस्त्यावर उतरत महामार्गावर झाराप-बायपास येथे रत्नागिरी, मुंबईहून तसेच सिंधुदुर्गातून मासे वाहतूक करणारी बारा ते पंधरा इन्सुलेटेड वाहने रोखत त्यांना माघारी पाठविले, तर मुंबईहून गोव्याकडे बेकायदा मासे वाहतूक करणारी खासगी बसही पकडली. नंतर प्रादेशिक परिवहन विभागाच्या पथकाने त्या बसवर दंडात्मक कारवाई केली.

दरम्यान, गोवा सरकारचा निर्णय आमच्यावर अन्यायकारक आहे. येथील चालक-मालकांना बेरोजगार करण्याचा कुटील डाव या सरकारने रचला आहे. त्यामुळे या जिल्हय़ातून गोव्याकडे मासे वाहतूक करणारी वाहने जाऊ देणार नाही, असा इशारा वाहनधारकांनी दिला आहे.

जिल्हय़ातील मासे वाहतूकदार संतप्त

गोवा राज्य सरकारने केमिकलयुक्त मासे (फार्मेलीन) सिंधुदुर्ग, रत्नागिरी येथून वाहतूक होत असल्याचा आरोप करून या जिल्हय़ातील मासे वाहतूक करणाऱया वाहनांना बंदी घातली आहे. तसेच इन्सुलेटेड वाहनांतूनच मासे वाहतूक करण्याचे कारण पुढे करून सिंधुदुर्ग-रत्नागिरीतील मासे वाहतूक करणाऱया वाहनांवर बंदी घातली. त्यामुळे सिंधुदुर्ग मासे वाहतूकदार संतप्त बनले आहेत.

मासे वाहतूकदार एकवटले

रत्नागिरी, मुंबई येथून गोव्याकडे इन्सुलेटेड वाहनातून मासे वाहतूक सुरू आहे. तसेच वेंगुर्ले, निवती, शिरोडा येथूनही अशा वाहनातून मासे वाहतूक सुरू आहे. ही वाहतूक बंद करून गोवा सरकारची गोची करण्यासाठी सिंधुदुर्गातील मासे वाहतूकदार एकवटले आहेत. मुंबई-गोवा महामार्गावर झाराप-बायपास येथे काल रात्री बारा वाजल्यानंतर गोव्याकडे मासे वाहतूक करणारी वाहने अडविण्याची मोहीम त्यांनी हाती घेतली.

दहा ते बारा वाहने रोखली

रात्रभर रत्नागिरी येथून गोव्याकडे मासे घेऊन जाणारी इन्सुलेटेड वाहने रोखली. अशी दहा ते बारा वाहने रोखत ती माघारी पाठविली. राजा शंकरदास, किरण कांबळी, चंदन जामदार, संतोष कोयंडे, सौरभ भोगटे, संदीप पेडणेकर, अंकुश वेंगुर्लेकर, गोल्डन फर्नांडिस, बाबुराव साळगावकर यांच्यासह जिल्हय़ातील 40 ते 50 वाहनधारक सहभागी झाले होते.

खासगी बसही पकडली

गुजरातहून गोव्याकडे मासे वाहतूक होते. मुंबई येथून खासगी बसमधून ही वाहतूक केली जात असल्याने या वाहनधारकांनी गोव्याकडे जाणाऱया खासगी बसेसही अडवून तपासण्यास सुरुवात केली. आज सकाळी गोव्याकडे जाणाऱया एका खासगी बसमध्ये मागील डिकीमध्ये मासे भरलेले सहा ट्रे सापडले.

आरटीओ पथकाकडून दंडात्मक कारवाई

बस तेथेच रोखून धरण्यात आली. नंतर कुडाळ पोलीस उपनिरीक्षक गायत्री पाटील व सहकारी घटनास्थळी गेले. त्यांनी वाहनधारकांशी चर्चा केली असता, या बेकायदेशीर मासे वाहतुकीवर कारवाईची मागणी करण्यात आली. प्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱयांशी संपर्क साधल्यानंतर त्यांनी भरारी पथक तेथे पाठविले. प्रवासी वाहनातून बेकायदेशीर मासे वाहतूक केल्याप्रकरणी त्या पथकाने दंडात्मक कारवाई केली. झाराप सरपंच स्वाती तेंडोलकर, राजू तेंडोलकर, पोलीस पाटील सुरेश गावकर हेही उपस्थित होते. बसमधील प्रवाशांच्या गैरसोयीबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.

वेंगुर्ले, निवतीतही केला विरोध

सिंधुदुर्गातील वेंगुर्ले, निवती, शिरोडा बंदरावरून इन्सुलेटेड वाहनांतून गोव्याकडे मासे वाहतूक सुरू होती. त्यामुळे वेंगुर्ले, निवती बंदरावरही काल रात्री चालक-मालकांचे पथक तेथे नेमले होते. गोव्याला मासे नेण्यासाठी आलेल्या वाहनांमध्ये मासे भरण्यास विरोध करीत ही वाहने माघारी पाठविल्याचे सांगण्यात आले. 

सिंधुदुर्गातल्या वाहनधारकांनाही अटकाव करणार

या अगोदर मासे वाहतूक करणाऱया वाहनातील माशांची तपासणी केली असता, एकाही वाहनातील मासे केमिकलयुक्त आढळले नाहीत, असा गोवा राज्याचा अहवाल आहे. तरीही इन्सुलेटेड वाहनांमधूनच मासे वाहतूक करण्याचे कारण पुढे केले जात आहे, असा आरोप करून या जिल्हय़ातून गोवा येथे जाण्यासाठी दोन तास पुरेसे आहेत. ताज्या मासळीला इन्सुलेटेड वाहनाची आवश्यकता नाही. यापुढेही सिंधुदुर्गातील मासे वाहतूक करणाऱया गोवा राज्यातील कोणत्याही वाहनात मासे भरू देणार नाही. सिंधुदुर्गातून मासे वाहतूक करणाऱया वाहनांनाही आम्ही अटकाव करणार आहोत, असा इशाराही या वाहनधारकांनी दिला आहे.

प्रशासनाचे सहकार्य नाही

गोवा राज्याने एखादा निर्णय घेतला, तर त्याची कडक अंमलबजावणी तेथील प्रशासन आमच्यावर करते. मात्र, आमच्यावर अन्याय होत असताना प्रशासन आमच्या पाठिशी राहत नाही, असा आरोप जिल्हय़ातील या वाहनधारकांनी करून जिल्हा प्रशासन, पोलीस व आरटीओ प्रशासनाचे सहकार्य मिळत नाही, अशी नाराजी व्यक्त केली.

Related posts: