|Monday, December 9, 2019
You are here: Home » राष्ट्रीय » मोदी चांगले मित्र, भारत धूर्त व्यापारी!

मोदी चांगले मित्र, भारत धूर्त व्यापारी! 

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे गौरवोद्गार : व्हाइट हाउसमध्ये केली दिवाळी साजरी

वृत्तसंस्था/  वॉशिंग्टन

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना चांगला मित्र ठरवून व्यापार विषयक करारांच्या वाटाघाटी करण्यात भारत तरबेज असल्याचे उद्गार काढले आहेत. रशियासोबत एस-400 क्षेपणास्त्र सुरक्षा यंत्रणा खरेदीचा व्यवहार आणि त्यानंतर इराणकडून तेलखरेदीवर अमेरिकेच्या निर्बंधांपासून सूट प्राप्त करण्यास भारताने यश मिळविल्याच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांचे विधान महत्त्वाचे ठरते. व्हाइट हाउसमध्ये दिवाळी साजरी करताना ट्रम्प यांनी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मैत्रीसाठी ‘कृतज्ञ’ असल्याचे म्हटले आहे.

भारतासोबत चांगला व्यापार विषयक करार करण्यासाठी आम्ही मोठी मेहनत घेत आहोत. भारतीय खरोखरच चांगले व्यापारी आहेत, ते चांगल्याप्रकारे वाटाघाटी करतात. करारांप्रकरणी भारतीय सर्वोत्तम असल्यानेच आम्ही काम करत असून एकत्रितपणे वाटचाल करत असल्याचे ट्रम्प यांनी भारतीय समुदायाला उद्देशून म्हटले आहे. ट्रम्प यांनी व्हाइटच्या हाउसच्या ऐतिहासिक रुझवेल्ट रुममध्ये दिवाळी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यात प्रतिष्ठित भारतीय उद्योजक, प्रशासक आणि अधिकाऱयांनी भाग घेतला.

मोदी-ट्रम्प यांची भेट

अर्जेटिना येथील जी-20 परिषदेत पंतप्रधान मोदी तसेच मी सहभागी होणार आहे. तेथेच आम्हा दोघांची बैठक होण्याची शक्यता असल्याचे ट्रम्प यांनी सांगितले. ट्रम्प यांनी व्हाइट हाउसमध्ये दिवाळीच्या जल्लोषावेळी भारताचे राजदूत नवतेज सिंग सरना यांना लवकरच तुमच्याशी बोलणार असल्याचे सांगितले आहे. भारताबद्दल माझ्या मनात विशेष भावना आहे. मला भारत देश अत्यंत आवडतो. पंतप्रधान नरेंद्र मोदींकरता माझ्या मनात अत्यंत आदर असून कृपया माझ्यावतीने त्यांना हार्दिक शुभेच्छा द्या, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.

द्विपक्षीय संबंधांचा सर्वोत्तम कालखंड

कन्या इवांका यांच्या भारत दौऱयादरम्यान मोदींसोबत झालेल्या तिच्या भेटीचा ट्रप यांनी यावेळी उल्लेख केला. मोदी आता इवांकाचे देखील मित्र झाले आहेत. भारत जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला देश आहे. दोन्ही देशांमधील संबंध स्वातंत्र्य, समृद्धी आणि शांततेच्या रक्षणासाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकतात. भारत-अमेरिका संबंध सध्या सर्वोत्तम कालखंडातून वाटचाल करत असल्याचे उद्गार त्यांनी काढले आहेत.

Related posts: