|Saturday, December 7, 2019
You are here: Home » क्रिडा » महिलांची वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिप आजपासून

महिलांची वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिप आजपासून 

नोव्हेंबरपर्यंत चालणार स्पर्धा, मेरी कोम, सरिता देवीकडून भारताला आशा

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

भारताची नामांकित महिला बॉक्सर एमसी मेरी कोम गुरुवारपासून येथे सुरू होणाऱया एआयबीए महिला वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये आणखी एक सुवर्ण मिळविण्याच्या निर्धाराने उतरणार आहे. स्पर्धेसाठी सर्व खेळाडू सज्ज झाले असले तरी कोसोवोच्या एकमेव बॉक्सरच्या सहभागावरून निर्माण झालेल्या वादाचे त्याला गालबोट लागले आहे तर दिल्लीतील प्रदूषित हवामानाचीही स्पर्धकांनी धास्ती घेतली आहे.

या स्पर्धेची ही दहावी आवृत्ती असून 72 देशांतील 300 हून अधिक महिलांनी त्यात भाग घेतला आहे. त्यामुळे आजवरची ही सर्वात मोठी स्पर्धा ठरली आहे. उझ्बेकिस्तानचे वादग्रस्त उद्योगपती गफुर रखिमोव्ह यांची अध्यक्षपदी निवड झाल्याने ऑलिम्पिकमधील बॉक्सिंगच्या भवितव्याबाबत अनिश्चितता निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर ही स्पर्धा होत आहे. जागतिक महिला बॉक्सिंगमधील तिसरी शक्ती, असा लौकीक भारताने मिळविला असून सर्वाधिक पदके मिळविण्याच्या बाबतीत भारत तिसऱया स्थानावर आहे. भारतात ही स्पर्धा दुसऱयांदा भरविली जात असून यापूर्वी 2006 मध्ये झालेल्या स्पर्धेत भारताने 4 सुवर्ण, 1 रौप्य व 3 कांस्यपदकांसह एकूण 8 पदके मिळविली होती.

यावेळी भारताचे 10 खेळाडूंचे पथक या स्पर्धेत खेळणार असून युवा व अनुभवी खेळाडूंचे त्यात मिश्रण आहे. 2006 मधील यशाची पुनरावृत्ती त्यांच्याकडून अपेक्षित असून किमान 3 सुवर्णपदकांची आशा केली जात आहे. 35 वषीय मेरी कोम हे भारताचे सर्वात मोठे आशास्थान असून तिने आयर्लंडच्या केटी टेलरइतकीच 5 सुवर्णपदके जिंकली आहेत. मेरीने आणखी एक सुवर्ण जिंकल्यास या स्पर्धेच्या इतिहासातील ती सर्वात यशस्वी महिला बॉक्सर होईल. ‘मॅन्गिफिसन्ट मेरी’ असे संबोधले जाणारी मेरी कोम 48 किलो गटात खेळणार असून घरच्या प्रेक्षकांसमोर दुसरे सुवर्ण जिंकण्यास तीही उत्सुक झाली आहे. या वर्षात तिने दमदार प्रदर्शन केले असून राष्ट्रकुल स्पर्धा, इंडिया ओपन स्पर्धा व पोलंडमधील आंतरराष्ट्रीय स्पर्धेत तिने सुवर्ण मिळविले आहे. मात्र सुवर्णपदकांपर्यंतचा मार्ग यावेळी सोपा असणार नाही, याची तिला जाणीव आहे.

आणखी एक खेळाडू दुसरे सुवर्ण मिळविण्यासाठी उत्सुक आहे, ती म्हणजे एल. सरिता देवी. ती 60 किलो गटात खेळणार असून पाच आशियाई किताब मिळविले असून 2006 मध्ये या स्पर्धेत तिनेही सुवर्ण जिंकले होते. भारतीय पथकातील अन्य खेळाडूंत पिंकी जांगरा (51 किलो गट), मनीषा मौन (54), सोनिया (57), सिमरनजित कौर (64), लवलिना बोर्गोहेन (69), सवीती बोरा (75), भाग्यबती कचारी (81), सीमा पुनिया (81 वरील) यांचा समावेश आहे. दहा दिवस चालणाऱया या स्पर्धेची सांगता 24 नोव्हेंबरला होणार असून त्यात नामवंतांचा सहभाग आहे.

Related posts: