|Monday, August 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » गणपती मुरूगन मंदिर कार्तिक सेवेसाठी 22 व 23 रोजी खुले

गणपती मुरूगन मंदिर कार्तिक सेवेसाठी 22 व 23 रोजी खुले 

प्रतिनिधी/ मडगाव

रावणफोंड – मडगाव येथील मिलिटरी कॅम्पजवळील प्रसिद्ध गणपती मुरुगन मंदिर कार्तिकी पौर्णिमेनिमित्त कार्तिक सेवेसाठी गुरुवार दि. 22 व शुक्रवार दि. 23 नोव्हेंबर रोजी पहाटे 5 पासून रात्री 10 वाजेपर्यंत खुले राहणार आहे. अभिषेक व पूजा करु इच्छिणाऱया भाविकांनी येताना पूजेचे साहित्य आणि सोवळे घेऊन यावे, असे कळविण्यात आले आहे.

कार्तिकस्वामी हा गणपतीचा भाऊ त्यांच्यावर कुबेर व लक्ष्मीचा वरदहस्त असल्याचे मानले जाते. त्यामुळे ज्या ठिकाणी नवग्रहांसहित कार्तिकस्वामीचे मंदिर आहे, त्या ठिकाणी दर्शन व सेवा केल्यास सुख, शांती, आरोग्य, विद्या, धन, संततीप्राप्ती होते, अशी धारणा आहे. सदर मंदिर दक्षिणेतील शास्त्र व पद्धतीप्रमाणे स्थापन केलेले असून या ठिकाणी नित्य पूजा, सेवा तसेच दर मंगळवारी अन्नदान सेवा केली जाते.

गणपती व मुरुगन यांची एकत्र मूर्ती असलेले कोंकण भागातील हे एकमेव मंदिर असल्याने कर्नाटक, महाराष्ट्र व गोव्यातील भाविक येथे मोठय़ा संख्येने येतात. भाविकांनी सांगे, केपे येथे जाणारी बस मडगाव बसस्थानकावर पकडून रावणफोंड मिलिटरी कॅम्पजवळील थांब्यावर उतरावे. रेल्वेतून येणाऱया भाविकांनी आकें येथे बस पकडून वरील थांब्यावर उतरावे असे देवस्थान समितीने कळविले आहे.