|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » राष्ट्रीय विद्यापीठांनी नवे बदल स्विकारावे

राष्ट्रीय विद्यापीठांनी नवे बदल स्विकारावे 

प्रतिनिधी/ कोल्हापूर

सध्या उच्चशिक्षण क्षेत्रासमोर अनेक आर्थिक व प्रतिकूल आव्हाने उभी राहताहेत. या परिस्थितीत जागतिक स्पर्धेत आपला विद्यार्थी कसा टिकेल, याची चिंता करण्याची वेळ प्रादेशिक विद्यापीठांवर आलेली आहे. त्यामुळे नव्या बदलांना सामोरे जाण्यास विद्यापीठांनी सज्ज व्हावे, असे प्रतिपादन जळगावच्या कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी.पी. पाटील यांनी केले.

शिवाजी विद्यापीठाच्या 56 व्या वर्धापन दिनी आयोजित बक्षीस वितरण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहात झालेल्या या समारंभाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे होते. दरम्यान कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. तसेच विद्यापीठ परिसरातून विशेष रॅली काढण्यात आली.   

कुलगुरू डॉ. पाटील म्हणाले, भविष्यात समाज विद्यापीठांकडे येणार नाही. तर विद्यापीठांनीच आता समाजाकडे जाण्याची गरज आहे. त्या अनुषंगाने त्यांनी स्वतःच्या कार्यप्रणालीत आणि धोरणांत बदल करण्याची गरज आहे. पारंपरिक शिक्षण पद्धती बदलून आता नवतंत्रज्ञान आणि कौशल्यावर आधारित अभ्यासक्रम तयार करण्याची गरज आहे. नाविन्यपूर्ण व समाजाभिमुख संशोधनाचे महत्त्व अबाधित राहणार आहे. त्या दृष्टीने प्रशासकीय संशोधनाच्या पलिकडे जाऊन विद्यापीठांनी संशोधनाला चालना देण्याची गरज आहे. कल्पकता आणि कठोर परिश्रम यांच्या जोरावर नवसंशोधन करणाऱया विद्यार्थ्यांना आवश्यक त्या सुविधा पुरवाव्यात. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आणि शिवाजी विद्यापीठांनी ग्रामीणतेचा शिक्का पुसावा.

अध्यक्षीय भाषणात कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे म्हणाले, शिवाजी विद्यापीठात सेंटर फॉर व्हीएलएसआय डिझाईन आणि सेंटर फॉर नॅनो-फॅब्रिक्स ही दोन केंद्रे उभारण्यात येणार आहेत. सेंटर फॉर नॅनो फॅब्रिक्समध्ये नॅनो तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आधुनिक कापड निर्मितीच्या अनुषंगाने संशोधन करण्यात येणार आहे. सेंटर फॉर व्हीएलएसआय डिझाईन हे केंद्र आपल्या राष्ट्रीय योगदानाचे प्रतीक ठरणार आहे. आजवर साऱया जगात केवळ गुगल या अमेरिकी कंपनीची जीपीएस प्रणाली वापरली जात होती. भारताने स्वतः विकसित केलेली आय.आर.एन.एस.एस. ही उपग्रह मालिका अवकाशात यशस्वीरित्या प्रक्षेपित केली आहे. शिवाजी विद्यापीठाच्या पन्हाळा येथील अवकाश केंद्रामध्येही या उपग्रह मालिकेचा एक रिसिव्हर बसविण्यात आला आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांवरील विशेष मल्टिमीडिया संग्रहाचे उद्घाटन करण्यात आले. विद्यापीठातील, महाविद्यालयांतील गुणवंत शिक्षक, प्रशासकीय सेवक, त्यांची गुणवंत पाल्ये यांना पारितोषिके देवून गौरव करण्यात आला. तसेच, प्रशासकीय गुणवत्ता अभियानांतर्गत पुरस्कार प्राप्त प्रशासकीय विभाग व अधिविभाग यांनाही पुरस्कार प्रदान करण्यात आले. प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांनी प्रास्ताविक केले. नंदिनी पाटील व धैर्यशील यादव यांनी सूत्रसंचालन केले. कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी आभार मानले.यावेळी परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक महेश काकडे, वित्त व लेखाधिकारी व्ही. टी. पाटील, अधिष्ठाता डॉ. पी.डी. राऊत, डॉ. पी. एस. पाटील, डॉ.ए. एम. गुरव, डॉ. भारती पाटील, इनक्युबेशन व इनोव्हेशन सेंटरचे संचालक डॉ. आर. के. कामत, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. आर. व्ही. गुरव, राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक डॉ. डी. के. गायकवाड, क्रीडा अधिविभाग प्रमुख डॉ. पी. टी. गायकवाड, बॅ. बाळासाहेब खर्डेकर ज्ञानस्त्रोत केंद्राच्या संचालक डॉ. नमिता खोत आदी उपस्थित होते.

विविध पारितोषिक विजेते 

विद्यापीठातील गुणवंत शिक्षक: प्रा.डॉ. भारती पाटील (राज्यशास्त्र अधिविभाग), प्रा.डॉ. आर.के. कामत (इलेक्ट्रॉनिक्स अधिविभाग). विद्यापीठातील गुणवंत सेवक: श्रीमती टी.एस. भुतकर (सहाय्यक कुलसचिव), श्री. नामदेव नानासो चरापले (वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक (रसायन)), श्री. भास्कर राजाराम सांगावकर (वरिष्ठ लघुलेखक), श्री. सदानंद श्रीधर माने (वरिष्ठ लघुलेखक), श्री. मारुती नारायण मगदूम (हवालदार). महाविद्यालयीन गुणवंत सेवक: डॉ. अरुणकुमार जयराम सकटे (प्रबंधक, छत्रपती शिवाजी महाविद्यालय, सातारा).

Related posts: