|Tuesday, June 18, 2019
You are here: Home » Top News » राज्यात थंडी परतली ; विदर्भ गारठला, मध्य महाराष्ट्रातही पारा खाली

राज्यात थंडी परतली ; विदर्भ गारठला, मध्य महाराष्ट्रातही पारा खाली 

ऑनलाईन टीम / पुणे :

राज्यात थंडी परतली असून, विदर्भासह राज्यात किमान तापमानाचा पारा घसरला आहे. सोमवारी सकाळी नागपुरात सर्वांत कमी 11.2 अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदविण्यात आले. दरम्यान, ही स्थिती पुढील चार दिवस कायम राहणार असून, रात्रीच्या तापमानात घट होण्याची शक्यता हवामान विभागाने सोमवारी वर्तविली.

अरबी समुद्र तसेच बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात गेल्या आठवडय़ात ढगाळ वातावरण तसेच काही भागाला अवकाळी पावसाने झोडपले. त्यामुळे थंडी गायब झाली होती. याचा प्रभाव ओसरल्यानंतर आता उत्तरेकडून येणाऱया थंड वाऱयात वाढ झाली असून, परिणामी राज्यात थंडी परतली आहे. यातही विदर्भात किमान तापमानाचा पारा कमी झाला आहे, तर कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडय़ाच्या तापमानातही किंचित घट झाली आहे. ही स्थिती पुढील चार दिवसांपर्यंत कायम राहील, असा अंदाज आहे.

सोमवारी सकाळी राज्यातील प्रमुख शहरांत नोंदविण्यात आलेले किमान तापमान पुढीलप्रमाणे ः मुंबई, कुलाबा 24, सांताक्रूझ 21, अलिबाग 20.9, रत्नागिरी 20.8, पणजी 22.4, डहाणू 21.3, पुणे 13.6, नगर 12, जळगाव 14.6, कोल्हापूर 19, महाबळेश्वर 15.8, मालेगाव 15.2, नाशिक 13.2, सांगली 16.3, सातारा 15, सोलापूर 17.2, उस्मानाबाद 16.1, औरंगाबाद 12.8, परभणी 13.2, नांदेड 15, अकोला 13.7, अमरावती 16, बुलढाणा 14.2, ब्रह्मपुरी 12.3, चंद्रपूर 15.6, गोंदिया 11.5, वर्धा 13.2, यवतमाळ 13.4.