|Monday, September 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » मनपा ‘स्थायी’त गदारोळ, सभा गुंडाळली

मनपा ‘स्थायी’त गदारोळ, सभा गुंडाळली 

प्रतिनिधी /सांगली :

महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभेत शनिवारी सभेच्या कायदेशीर बाबीवरून सत्ताधारी आणि विरोधकांत गदारोळ झाला. सभा कायदेशीर नसल्याचा दावा विरोधी सदस्यांनी केला तर सभा कायदेशीरच आहे, असे म्हणत सभेतील सर्व विषयाला मंजुरी देत सभापतींनी सभा संपविली.

गेल्या सभेचे इतिवृत्तच नोंदवले गेले नसल्याने विरोधी काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी सत्ताधाऱयांना धारेवर धरले. नंतर नगरसचिवांच्या कार्यालयात तीन तास ठिय्या मारला. नगरसचिव के. सी. हळिंगळे यांच्याकडून सभेच्या कायदेशीर बाबींची तसेच इतिवृत्ताबाबतचे लेखी घेतल्यानंतरच ठिय्या आंदोलन मागे घेतले. याप्रकरणी  विभागीय आयुक्तांकडे तक्रार करण्याचा तसेच वेळ प्रसंगी न्यायालयात दाद मागण्याचा इशारा यावेळी विरोधी सदस्यांनी दिला.  सत्ताधाऱयांना बदनाम करण्याचा अधिकाऱयांनी सुरू केल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. याप्रकरणी नगरसचिवांची चौकशी कारवाई करण्याचे आदेश ग्वाही यावेळी उपायुक्त यांनी केली.

महापालिकेच्या स्थायी समितीची शनिवार सभा होती. सभापती अजिंक्य पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सभा सुरु झाल्यावर मागील सभेचे इतिवृत्त वाचून ते कायम करण्याचा विषय होता. त्यावेळी मागील सभेचे इतिवृत्त देण्याची मागणी विरोधी नगरसेवकांनी नगरसचिवांकडे केली. मात्र इतिवृत्तच लिहिले नसल्याचे त्यांनी सांगितले. हा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर त्याची माहिती काँग्रेस, राष्ट्रवादीच्या सदस्यांनी मागितली असता गेल्या तीन सभांचे इतिवृत्त लिहीलेले नाही असे स्पष्ट करण्यात आले. यावरुन गोंधळ निर्माण झाला.