|Monday, August 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » राणूबाईसाहेब जाधवराव समाधीबाबत निर्णय घ्या

राणूबाईसाहेब जाधवराव समाधीबाबत निर्णय घ्या 

भारतीय रक्षक आघाडीची मागणी : कार्यवाही न झाल्यास 18 रोजी जलठिय्या आंदोलन

प्रतिनिधी/ सातारा

शिवकन्या राणूबाईसाहेब जाधवराव यांची समाधी असलेल्या ठिकाणी भुईंज येथील जागेवर इमारत बांधकाम करण्यात आले आहे. मात्र, मिळत असलेल्या माहितीवरुन येथे राणूबाईसाहेब जाधवराव यांची समाधी असल्याचे मौखिक परंपरा व इतिहासातील नोंदीवरुन आढळून येत आहे. भुईंज ग्रामपंचायतीने येत्या 15 दिवसात याबाबतचा खरा इतिहास समोर आणावा अन्यथा दि. 18 रोजी भारतीय रक्षक आघाडीचे कार्यकर्ते कृष्णा नदीपात्रात जलठिय्या आंदोलन करतील, असा इशारा आघाडीचे सातारा जिल्हाध्यक्ष अरबाज शेख यांनी दिला.

याबाबत प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनात अरबाज शेख यांनी म्हटले आहे की, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या द्वितीय कन्या राणूबाईसाहेब जाधवराव यांची समाधी वृदांवन भुईंज येथे असल्याचे समजते. ही समाधी राणूबाईसाहेबांची असावी असे मत भुईंजचे भैय्यासाहेब जाधवराव यांनी व्यक्त केले आहे. या जागेच्या उताऱयावर त्या जागेत घुमटाच्या आकाराचा चबुतरा असल्याची ग्रामपंचायत दफ्तरी नोंद आहे. जाधवराव यांच्या वंशावळीत केवळ पुरुषांच्याच नावाचा उल्लेख असल्याने राणूबाईसाहेब यांचा नामोल्लेख आढळत नाही. पण राणूबाई यांना वाई परागण्यातील जाधव घराण्यात दिल्याची नोंद ऐतिहासिक कागदपत्रात आढळते. इतिहास संशोधिका डॉ. कमल गोखले यांनी यांच्या शिवपुत्र संभाजी पुस्तकात पान क्रमांक 42 वर राणूबाईंना जाधव घराण्यात दिल्याचा स्पष्ट उल्लेख आहे. याच पुस्तकाचा आधार घेवून सध्या स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेचे लेखन होत आहे.

या समाधीच्या ठिकाणी दिवाबत्ती व दर्शनासाठी जाण्यास जाधवराव यांच्या वाडय़ातून भुयारी मार्ग होता. जर ती समाधी सामान्य स्त्राrची असती तर दिवाबत्तीची सोय करण्यात आली नसती. तर समाधीच्या दगडावरील शिल्पे मोठय़ा सरदार घराण्यातील लोकांच्या समाधीवर असू शकतात. जाधवराव घराण्याकडे असलेली जुनी, मोडी लिपीतील कागदपत्रे भाषांतरीत करुन परत देतो म्हणून बाबासाहेब पुरंदरे घेवून गेले आहेत. या कागदपत्रात राणूबाईसाहेबांच्या समाधीविषयीची आणखी माहिती मिळणे शक्य आहे. सध्या या जागेवर विजयसिंह जाधव यांनी 1991 सालात बांधलेली इमारत उभी आहे. या जागेत समाधीचा चबुतरा असताना ग्रामपंचायतीने इमारतीच्या बांधकामास परवानगी दिलीच अशी असा आमचा सवाल आहे. या जागेवर इमारत बांधताना कलश सापडल्याचे वयोवृध्द व्यक्ती सांगतात व त्यांनी त्यावेळी या जागेवर इमारत बांधू नका अशी विनंतीही विजयसिंह जाधव यांना केली होती.

दरम्यान, या ठिकाणी असलेली समाधी राणूबाईसाहेबांची असल्याचे पुरावे जरी उपलब्ध होत नसले तरी मौखिक परंपरा आणि इतिहासातील काही नोंदीवरुन ही समाधी राणूबाईसाहेबांची असण्याला पुष्टी मिळत आहे. ग्रामपंचायतीने येत्या 15 दिवसात याबाबतच्या खरा इतिहास समोर आणावा, अन्यथा भारतीय रक्षक आघाडीतर्फे 18 रोजी जलठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा इशारा अरबाज शेख यांनी दिला आहे.