|Monday, February 17, 2020
You are here: Home » Top News » मोदी हे पंतप्रधान नसून, प्रचारमंत्री प्रियंका चतुर्वेदी यांची टीका, पोस्टर प्रदर्शनाचे उद्घाटन

मोदी हे पंतप्रधान नसून, प्रचारमंत्री प्रियंका चतुर्वेदी यांची टीका, पोस्टर प्रदर्शनाचे उद्घाटन 

 पुणे / प्रतिनिधी :

महागाई वाढ, रोजगाराची वानवा, वाढता भ्रष्टाचार, महिलांची असुरक्षितता हे भाजप सरकारचे अच्छे दिन आहेत का? देशात 60 वर्षात काहीच झाले नाही, जे काही झाले ते 2014 पासूनच झाले, असे सांगण्याचे काम मोदी सरकार करीत आहे. गेल्या 60 वर्षात केवळ काँग्रेसमुळे नाही, तर संपूर्ण देशवासियांच्या मेहनतीमुळे देशाचा विकास झाला आहे. मात्र, अच्छे दिनच्या नावाखाली आम्हीच सर्वकाही केले, असे सांगणाऱयांना देश माफ करणार नाही. नरेंद्र मोदी हे प्रधानमंत्री नसून केवळ प्रचारमंत्री आहेत, असा आरोप काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी यांनी केला.

काँग्रेस पक्षाच्या नेत्या आदरणीय श्रीमती सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त ‘सेवा, कर्तव्य, त्याग’ सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. काँग्रेस पक्षाच्या देश, राज्य व पुण्याच्या विकासात काँग्रेसने केलेल्या भरीव योगदानाविषयी व गेल्या साडे चार वर्षात नरेंद्र मोदी यांनी देशातील स्वायत्त संस्था संपुष्टात आणल्याचे चित्र लई झाली मन की बात, येऊन पहा काम की बात या पोस्टर प्रदर्शनाचे आयोजन बालगंधर्व कलादालनात करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन चतुर्वेदी यांच्या हस्ते झाले. यावेळी सप्ताहाचे मुख्य संयोजक माजी आमदार मोहन जोशी, शहर काँग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे, कैलास कदम, दत्ता गायकवाड, मुकारी अलगुडे, गोपाळ तिवारी, संगिता तिवारी, डॉ.सतिश देसाई, चंद्रशेखर कपोते आदी उपस्थित होते.

प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या, राफेल, राममंदिराबाबत या सरकारला कोणीही प्रश्न विचारायचे नाहीत. जनतेच्या खिशातून आलेला पैसा, मोदींना ज्यांनी 2014 मध्ये मदत केली त्या सूट-बुटातील मित्रांकरीता दिला जात आहे. महिला अत्याचारामध्ये महाराष्ट्र आज तिस-या स्थानावर आहे. त्यामुळे आता मन की बात नाही, तर जन की बात मोदींनी ऐकायला हवी. देशहितासाठी उभारलेल्या संस्था देखील या सरकारकडून उध्वस्त करण्याचे काम सुरु आहे. त्यामुळे आपण सर्वांनी एकत्रितपणे याविरोधात संघर्ष करायला हवा.

दरम्यान, पत्रकार परिषदेत बोलताना चतुर्वेदी म्हणाल्या, भाजप सरकारकडे त्यांनी केलेल्या कोणत्याही कामाची नोंद नाही. मध्यप्रदेश, राजस्थान, तेलंगणा, मिझोरमध्ये या सरकारविरोधी रोष आहे. सन 1980 पासून धर्म आणि जातीमध्ये फूट पाडण्याचे काम भाजप करीत आहे. त्यागाच्या नावावर राजनैतिक पोळी भाजण्याचे काम सुरु आहे. साडेचार वर्षात देशाला दिलेली वचने त्यांनी पूर्ण न करता केवळ विश्वासघात केला आहे. मंदिर वही बनाएंगे, तारीख नही बताएंगे अशी स्थिती राममंदिराबाबत आणि राफेल घोटाळय़ाबाबत झाली असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

Related posts: